प्रतिनिधी//
.
आलापली-सिरोंचा 353 सी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला तब्बल 8 वर्षानंतर सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, या महामार्गाअंतर्गत येत असलेल्या आलापल्लीते गुडीगुड्डम या मुख्य रस्त्याचे काम दर्जाहीन केले जात असल्याचे दृष्टीस पडत आहे. ब्याच मिक्स प्लांट च्या ऐवजी ड्रम ने DBM केले जात असल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम असेच केले जाते काय? असा प्रश्न सर्वसामान्य उपस्थित करीत आहेत.
आलापल्ली-सिरोंचा या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त होऊन 8 वर्षाचा कालावधी लोटला आहे. नुकताच या रस्त्याच्या कामाला संबंधित कंत्राटदारामार्फत कामास आरंभ करण्यात आला आहे. मात्र कंत्राटदार शासनासोबत केलेल्या करारनाम्यानुसार काम न करता आपल्या मनमर्जीने करत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत येत असलेल्या आलापल्ली-गुड्डीगुडम या 16 किमी रस्त्याचे खोदकाम न करताच काळ्या मातीवर गिट्टी टाकून काम करण्यात येत आहे. कामाची ही निकृष्ट स्थिती बघता निधीचा चुराडा होत असल्याचे समोर येत आहे. रस्त्याचे बांधकाम सुरु असतांना संबंधित विभागाचे अधिकारीही भेट देत नसल्याने कंत्राटदाराचे चांगलेच फावले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामात कोणतीही कचराई खपवून घेतली जाणार नाही, असा कडक संदेश संबंधित कंत्राटदाराना दिला आहे. असे असतांनाही राष्ट्रीय महामार्ग विभागांतर्गत रस्ता कामाचे कंत्राटदार तसेच विभागाचे अधिकारी कामाच्या दर्जाबाबत फारसे गांभीर्य दाखवित नसल्याने सर्वसामान्य नागरिकांद्वारे हा रस्ता किती दिवस टिकेल, असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. त्यामुळे सदर काम थांबवून या कामाची सखोल चौकशी करुन संबंधित कंत्राटदारावर कारवाई करीत काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
बॉक्ससाठी…
तब्बल 8 वर्षानंतर 57 कोटी निधीअंतर्गत या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. प्राप्त निधीअंतर्गत दर्जेदार काम होणे गरजेचे आहे. मात्र, कंत्राटदाराद्वारे मनमर्जीने निकृष्ट दर्जाचे काम केल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे. संबंधित विभागाच्या अधिका-यांनी वेळोवेळी कामस्थळ भेट देऊन पाहणी करणे गरजेचे आहे. मात्र, अधिकारी सोयीस्कर याकडे दुर्लक्ष करीत आहेत. असेच राहिल्यास या रस्त्याचा दर्जा काही दिवसातच खालवण्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे या कामाची सखोल चौकशी करुन संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे.