उपेक्षितांच्या दिवाळीत प्रकाश आणणारे उंब्रज पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांनी

105

गडचिरोल्ली// प्रतिनिधी

दिवाळी म्हटलं की प्रत्येक घरात आनंदाचा, उजेडाचा आणि गोडधोडाचा सण. पण काहींच्या आयुष्यात दिव्यांचा प्रकाश पोहोचतच नाही… कारण त्यांच्या घराचंच अस्तित्व नसतं. आई-वडिलांच्या मायेपासून वंचित अशी ही लेकरं अनाथ पण भावनांनी भरलेली. अशा मुलांच्या डोळ्यांतील निःशब्द दिवाळी यंदा उजळवली ती उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांनी.

कोळे येथील जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जिथं अनेक लहानगे प्रेमाच्या आणि आधाराच्या शोधात आहेत. दिवाळीच्या या दिवसांत या मुलांना भेटवस्तू, फटाके, मिठाई आणि हसण्याची भेट देऊन भोरे सरांनी त्यांच्या आयुष्यातला अंधार थोडासा कमी केला.
त्या क्षणी कठोर शिस्तीचे, धैर्यवान अधिकारी नव्हे तर एक संवेदनशील माणूस त्यांच्या आतून बाहेर आला. प्रत्येक मुलाशी बोलताना त्यांच्या डोळ्यांत भावनांचा पूर होता. काही क्षणांसाठी ते पोलीस नव्हते. ते एका मुलाचे दयाळू काका होते, जे त्याला प्रेमाने म्हणत होते बाळा, तुझीही दिवाळी आहे.
संस्थेचे प्रमुख समीर नदाफ यांनी या सेवाभावी कार्याची माहिती दिली. प्रत्येक मुलामागे एक वेगळी, गहन कथा आहे कोणाचं आई-वडिलांवरून छत्र हरवलंय, कोणाचं घरचं अस्तित्वच नाही. त्या कथा ऐकताना भोरे यांच्यासह उपस्थित पोलीस स्तब्ध झाले.
क्षणभर वातावरण भावनांनी भरून गेलं. दिव्यांचा प्रकाश, फटाक्यांचा आवाज आणि त्या मुलांच्या चेहऱ्यावरील हसू सगळं काही एकाच वेळी हृदयाला भिडणारं होतं.
भोरे यांनी सांगितलं, पोलीस म्हणून आम्ही कायदा सांभाळतो, पण समाजाचा आत्मा या मुलांमध्ये आहे. त्यांना आनंद देणं हीच खरी सेवा.
त्या दिवसाची ती भेट त्या मुलांसाठी फक्त दिवाळी नव्हती तर जगण्याची एक नवीन प्रेरणा होती.
त्या मुलांच्या डोळ्यांत झळकणारा उजेडच या दिवाळीचा खरा अर्थ सांगून गेला.
अंधार कितीही गडद असो एक माणुसकीचा दीप पुरेसा असतो जग उजळवायला.