आदिवासींच्या परंपरा व धार्मिक श्रध्दानुसार स्वतंत्र दफनभूमी उपलब्ध करून द्यावे अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद,गडचिरोलीचे आ. डॉ. मिलिंद नरोटे यांना निवेदन

102

गडचिरोली :- आदिवासींच्या परंपरा व धार्मिक श्रध्दानुसार स्वतंत्र दफनभूमी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद गडचिरोलीच्या वतीने आमदार डॉ .मिलिंद नरोटे साहेब यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
महाराष्ट्रातील आदिवासी समाजाचे जीवनमान, संस्कृती, श्रद्धा व परंपरा या स्वतंत्र, ऐतिहासिक व वैशिष्ट्यपूर्ण अशा आहेत. मृत्यू पश्चात अंत्यसंस्कार करण्याची पद्धत आदिवासी समाजात इतर समाजांपेक्षा वेगळी आहे.
आमच्या समाजात मृतांना दहन करण्याची परंपरा नाही, तर त्यांना दफन करण्याची परंपरा आहे. ही प्रथा आदिवासी समुदायात हजारो वर्षापासून चालत आलेली आहे आणि ती आपल्या धार्मिक श्रद्धेचा आणि सांस्कृतिक ओळखीचा एक भाग आहे.
तरी, सध्याच्या परिस्थितीत अनेक ठिकाणी एक सामान्य स्मशानभूमी वापरावी लागते, जी बहुतेकदा अंत्यसंस्कारासाठी राखीव असते. अशा ठिकाणी दफनविधी करणे अत्यंत कठीण आणि समस्याप्रधान बनत जात आहे. यामुळे कुठेतरी धार्मिक भावना दुखावतात आणि अनेकदा स्थानिक पातळीवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होत असते.
नवीन वसाहती, पुनर्वसन क्षेत्रे आणि सरकारी विकास योजनांमध्ये स्वतंत्र दफनभूमीचा विचार केला जात नाही.
म्हणूनच, आदिवासी समुदायाच्या चालीरीती, परंपरा आणि धार्मिक भावनांचा आदर करून आदिवासी समाजासाठी स्वतंत्र दफनभूमी उपलब्ध करुन देण्यात यावी अशी मागणी आदिवासी विकास युवा परिषद, गडचिरोली च्या वतीने आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद,गडचिरोली जिल्हाध्यक्ष कुणालभाऊ कोवे, संपर्कप्रमुख बादल मडावी,मिडिया जिल्हाप्रमुख रुपेश सलामे, एटापल्ली तालुका अध्यक्ष गिरीश जोगे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.