भद्रावती,:-गृह कर्जाचे हप्ते नियमित भरुनही घर जप्त करण्याची कारवाई कशी काय केली जाते? असा सवाल येथील विंजासन रोडवरील देवालय सोसायटीमधील रहिवासी वंदना पराग बोमरटवार यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रपरिषदेत उपस्थित केला.
पत्रपरिषदेत वंदना बोमरटवार यांनी सांगितले की, आम्ही देवालय सोसायटीमध्ये घर विकत घेतले.त्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चंद्रपूर येथील बाबुपेठ शाखेकडून १६ लाख ९६ हजाराचे गृह कर्ज घेतले. त्यासाठी बॅंकेसोबत १० वर्षेपर्यंत १४ हजार १०० रुपये हप्ता भरुन गृह कर्जाची परतफेड करण्याचा करार करण्यात आला. त्यानुसार नोव्हेंबर २०१८ पासून दर महिन्याला १४ हजार १०० रुपयांची कपात होणे सुरू झाले. ही कपात नियमित सुरू असून अगदी अलिकडे दि.५ डिसेंबरला हप्त्याची कपात झाल्याची बॅंकेच्या स्टेटमेंटमध्ये नोंद आहे,असेही वंदना बोमरटवार यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
नुकतेच दि.१३ डिसेंबर रोजी बॅंकेचे अधिकारी नायब तहसीलदार व पोलिस उपनिरीक्षकासह जप्तीकरिता घरी येऊन गेले. त्यांनी गृहकर्जाची उर्वरित रक्कम ११ लाख ६९ हजार त्वरित भरा अन्यथा तुमच्या घराला सील ठोकू असा दम दिला. परंतु आम्ही विनंती केल्याने त्यांनी दोन दिवसांची मुदत दिली. नियमित हप्ते भरत असताना आमच्या घरावर जप्तीची कारवाई करणे हा आमच्यावर अन्याय आहे. घर जप्त केल्यानंतर आम्ही कुठे राहायला जायचे? माझे सासरे वामनराव बोमरटवार हे पेंशनधारक आहेत. त्यांच्या पेंशन मधून आम्ही हप्ता भरतो. तर माझे पती पराग बोमरटवार हे मजुरी करतात. आम्ही पती-पत्नी, सासू-सासरे आणि लहान मुलगा असा आमचा परिवार असून आम्हाला आत्ताच कर्जाची उर्वरित रक्कम भरली तर आमच्या परिवाराचा उदरनिर्वाह करायचा कसा? दहा वर्षांच्या कराराचे काय? असे प्रश्नही वंदना बोमरटवार यांनी पत्रपरिषदेत उपस्थित केले. आम्ही नियमित हप्ते भरत असताना आमच्यावर जप्तीची कारवाई करू नये अशीही मागणी वंदना यांनी पत्रपरिषदेत केली.
पत्रपरिषदेला वामनराव बोमरटवार, पराग बोमरटवार आणि प्रमिला बोमरटवार उपस्थित होते. याबाबत बॅंक अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.