महाराष्ट्र तेलंगणा गोदावरी नदिवरील पुलाचा आडावा लोखंडी पिलर उखडला

45

सिरोंचा :शहरा लागत महाराष्ट्र तेलंगाणा जोडणारा गोदावरी नदीवरील पुलावरुन नेहमीच दैनंदिन राष्ट्रीय वाहतूक सुरु असते. मात्र मागील काही दिवसांपासून या पुलावरील लोखंडी पिल्लरला भेगा पडल्याचे दिसून येत आहे. पुलावरील या भेगा अपघातास आमंत्रण देत असतांना संबंधित विभागाने दुरुस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याने वाहनधारकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे.
गोदावरी नदी पुल हा राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत महाराष्ट्र व तेलंगणा राज्यांना जोडणारा पुल आहे. सिरोंचा तालुक्यातील नागरिकांचा तेलंगणा राज्याशी रोटीबेटीचा व्यवहार होत असल्याने सदर पुल दोन्ही राज्यातील नागरिकांसाठी महत्वाचा दुवा ठरत आला आहे. या पुलावरुन चारचाकी, दुचाकी वाहनांसह अवजड वाहनांची नेहमीच वर्दळ असते. दैनंदिनी शेकडो वाहने या पुलावरुन मार्गक्रमण करीत असतात. त्यामुळे संबंधित विभागाद्वारे वेळोवेळी या पुलाच्या देखभाल, दुरुस्तीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र याकडे डोळेझाक झाल्याने मागील काही दिवसांपासून या पुलाला भेगा पडतांना दिसून येत आहेत. पुल मार्गावर असलेल्या लोखंडी पिल्लरला भेगा गेल्याने यावरुन वाहन चालवितांना मोठ्या झटक्याचा सामना करावा लागत आहे. सदर मार्गावरील 24 तास वाहतूक सुरु राहत असल्याने पुलावरील या भेगामुळे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. असे असतांनाही संबंधित विभागाने मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने घेत तत्काळ पुलावरील या भेगा तत्काळ बुजविण्याची मागणी वाहतूकदारांसह नागरिकांकडून होत आहे.