प्रतिनिधी//
सिरोंचा तहसील कार्यालयात कार्यरत असलेले नायब तहसीलदार सय्यद हमीद सत्तार तब्बल बत्तीस वर्षे दोन महिने शासकीय सेवा केल्यानंतर 30 जून 2025 ला सेवा निवृत्त झाले. कर्तव्यदक्ष, नागरीकांच्या समस्यांचे निराकरणासाठी नेहमीच धावून जाणारे प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती़ शासकीय नोकरीतील हाच प्रशासकीय अनुभव सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी, शासकीय कार्यालयातील कामकाजातील अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी सेवानिवृत्तीनंतर स्वत:चे विशेष कार्यालय उघडून लोकांची मदत करण्याचा संकल्प घेतला आहे़ त्यांच्या या संकल्पनेचे कौतूक करीत सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी त्यांचा सत्कार करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या़
हमीद भैय्या म्हणून सर्वसामान्यांमध्ये सर्वपरिचित असलेले सय्यद हमीद सत्तार यांनी 3 मे 1993 रोजी भामरागड तहसील कार्यालयात कनिष्ठ लिपिक पदावर शासकीय सेवेत रुजू झाले़ 1996 पर्यंत भामरागड येथे सेवा बजावल्यानंतर त्यांची गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात बदली झाली. त्यानंतर जून 2000 साली ते सिरोंचा तहसील कार्यालयात रुजू झाले. 2012 पर्यंत सिरोंचात असतानाच त्यांना अवल कारकून पदावर पदोन्नती मिळाली. 2012 ते 2017 पर्यंत गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात असतानाच त्यांना नायब तहसीलदार पदावर पदोन्नती मिळाली. दरम्यान 2020 ते 2021 जूनपर्यंत त्यांनी सिरोंचा तहसीलदार पदावरही कार्य केले. त्यानंतर अहेरी येथे त्यांची बदली झाली. या काळात त्यांनी अहेरी आणि एटापल्ली या दोन्ही ठिकाणी तहसीलदार पदाची जबाबदारी सांभाळली. जुलै 2024 ला सिरोंचा येथे स्थानांतरण झालेले हमीद भाई यांनी सिरोंचा नायब तहसीलदार पदासह नगरपंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली.
सामान्य जनतेशी आपुलकीच्या भावनेने भेटणारे, कुठल्याही कामासाठी सकारात्मक भावनेने प्रतिसाद देणारे अधिकारी म्हणून हमीद भाई यांची ओळख होती. अहेरी, सिरोंचा, एटापल्ली याठिकाणी त्यांनी चांगला जनसंपर्क ठेवित लोकांमध्ये लोकाभिमुख कार्य करणारे अधिकारी अशी ओळख निर्माण केली. प्रशासनातल्या ज्या अधिकाऱ्यांना मी भेटलो, त्यामध्ये कुठल्याही गोष्टीला सकारात्मक पद्धतीने हो बघू प्रयत्न करू असे म्हणत त्या दिशेने पाऊल टाकणारे अधिकारी अशी हमीद भाईंची ओळख म्हणता येईल. पदावर असूनही जमिनीवर कार्यरत असलेले अधिकारी असा त्यांचा स्वभाव होता. ३२ वर्षे दोन महिन्याच्या शासकीय सेवेतील कालावधीनंतर निवृत्त होत असताना प्रशासनातील कार्याच्या अनुभवाचा तालुक्यातील जनतेसाठी नक्कीच ते वापर करतील अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी व्यक्त केली़ सय्यद हमीद यांच्या पुढील वाटचालीत प्रशासना तून बाहेर पडलेले नवीन सामाजिक कार्यकर्त्यांचे स्वरूप सिरोंचावासियांना दिसेल अशी अपेक्षा व्यक्त करीत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी ताटीकोंडावार यांनी शुभेच्छा दिल्या़