एटापल्लीत नगराध्यक्ष ‘झोपेत’, शहर समस्यांच्या विळख्यात नगराध्यक्ष एटापल्ली शहराकडे कधी लक्ष देणार

274

एटापल्ली शहरात समस्यांचा डोंगर उभा असताना नगराध्यक्ष मात्र झोपेत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये तीव्र झाली आहे. शहराचा कारभार पूर्णपणे ढेपाळला असून मूलभूत सोयीसुविधांसाठीही नागरिकांना झगडावे लागत आहे. स्वच्छतेच्या बाबतीत तर शहर पूर्णपणे नापास ठरले आहे.

*मुख्य रस्त्यांवर गुरांचे साम्राज्य:*
शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट गुरांचा (ढोरांचा) सुळसुळाट वाढला आहे.यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघातांची भीतीही वाढली आहे.सकाळी आणि सायंकाळी नागरिक आणि वाहनचालकांना यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. नगराध्यक्ष आणि प्रशासनाचे या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.

*१७ प्रभागांत कचरा आणि तुंबलेल्या नाल्या:*
शहरातील १७ ही प्रभागांमध्ये कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. जागोजागी कचरा कुजल्यामुळे दुर्गंधी पसरली असून साथीच्या रोगांची भीती निर्माण झाली आहे.शहरातील गटारे आणि नाल्या तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यांवर वाहत आहे.यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.स्वच्छतेच्या नावाखाली केवळ कागदोपत्री कामकाज सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

*शहरात स्वच्छता फक्त नावालाच:*
एटापल्ली शहरात स्वच्छ भारत अभियानाचा पूर्णपणे फज्जा उडाला आहे.स्वच्छतेची मोहीम केवळ नावालाच उरली असून प्रत्यक्षात शहरात सर्वत्र अस्वच्छता दिसत आहे. नगराध्यक्ष आणि नगरपंचायतीने याकडे तातडीने लक्ष देऊन नागरिकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून द्यावे अशी मागणी जोर धरत आहे.
एटापल्लीचे नगराध्यक्ष या गंभीर समस्यांकडे कधी लक्ष देणार आणि शहरवासीयांना या समस्येतून कधी मुक्ती मिळणार हाच प्रश्न सध्या नागरिकांना भेडसावत आहे.