एटापल्ली तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री छत्तीसगड राज्यातून आवक, अल्पवयीन मुले गेले आहारी

121

प्रतिनिधी//

_एटापल्ली:

एटापल्ली तालुक्यात सध्या सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री होत असून, गावागावांत या व्यसनाधीन पदार्थाचा शिरकाव झाला आहे. विशेषतः शालेय वयातील मुलांमध्ये याचे आकर्षण वाढत चालले आहे. मज़ा,आशिकि ‘मिठा पान मसाला’, ‘गुलाब तंबाखू’, अशा आकर्षक नावांनी विक्री होत असलेल्या या उत्पादनांमुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.

ही तंबाखू मुख्यतः छत्तीसगड राज्यातून अवैधरित्या एटापल्ली तालुक्यात आणली जात असून, किरकोळ दुकानांपासून ते पानटपऱ्यांपर्यंत तिची सहज विक्री होते. स्थानिक प्रशासन व पोलीस विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे विक्रेत्यांचे फावते आहे. शासनाच्या बंदी आदेशाची जाणीव असूनही खुलेआम चालणाऱ्या या विक्रीमुळे कायद्याचे उल्लंघन होत आहे.

सर्वात चिंतेची गोष्ट म्हणजे अनेक अल्पवयीन मुले या तंबाखूजन्य वस्तूंना सरावली असून, शाळेच्या परिसरातही ही उत्पादने सहज मिळत आहेत. यामुळे विद्यार्थी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत होत असून, त्यांचे शिक्षण आणि आरोग्य दोन्ही धोक्यात आले आहे. पालकही याबाबत अस्वस्थ आहेत

स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व आरोग्य क्षेत्रातील जाणकारांनी यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. शासकीय पातळीवर तपासणी मोहीम राबवून तंबाखूची विक्री थांबवण्याची गरज आहे. तसेच, शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती आणि आरोग्य जनजागृती कार्यक्रम सुरू करणे आवश्यक झाले आहे.

सरतेशेवटी, जर वेळेवर योग्य पावले उचलली नाहीत, तर एटापल्ली तालुक्याच्या भविष्यासमोर गंभीर संकट उभे राहील. प्रशासनाने जागे होऊन कठोर कारवाई केली पाहिजे. तरच भावी पिढीला व्यसनाच्या विळख्यातून वाचवता येईल.

*छत्तीसगडहून सुगंधित तंबाखूचा पुरवठा; जारावंडी-पेंढरी मार्गे जिल्हाभर खुलेआम विक्री*

या सुगंधित तंबाखूचा स्रोत छत्तीसगड राज्य असून, तिथूनच मोठ्या प्रमाणात ही तंबाखू महाराष्ट्रात आणली जात आहे. विशेषतः एटापल्ली, अहेरी, भामरागड, सिरोंचा, गडचिरोली धनोरा,आणि आरमोरीसारख्या तालुक्यांत तिची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. यामध्ये आरमोरी तालुक्यातील एक प्रख्यात विक्रेता आघाडीवर असून, तो छत्तीसगडहून ही तंबाखू जारावंडी-पेंढरी मार्गे वाहनांद्वारे जिल्ह्यात आणतो आणि नंतर जिल्ह्याच्या विविध भागांतील किरकोळ विक्रेत्यांपर्यंत पोहोचवतो. या रूटचा वापर करून तंबाखूचा साठा सीमावर्ती भागांत अगदी सहजपणे पोहोचवला जातो, ज्यामुळे या व्यापारावर कुणाचेच नियंत्रण राहत नाही. प्रशासनाने अनेकदा माहिती मिळूनही कारवाई न केल्यामुळे अशा विक्रेत्यांचे धाडस वाढले असून, जिल्हा सुगंधित तंबाखूचा मोठा बाजारपेठ बनू लागला आहे. हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या आरोग्याशी होणारा गंभीर धोका ठरत आहे.