अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेराच्या वतीने घटनास्थळी भेट
गडचिरोली:-आलापल्ली वन विभाग अंतर्गत येत असलेल्या मार्कंडा वन परिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात बापूजी नानाजी आत्राम (४५) रा.लोहारा, तालुका मुलचेरा हे ठार झाले असून रेंगेवाही उपक्षेत्रातील २९३ मध्ये त्याचा मृतदेह आढळून आला अशी माहिती अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद मुलचेराचे अध्यक्ष सतीश पोरतेट यांना मिळताच त्यांनी संघटनेचा पदाधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली.
मागील पाच महिन्यापासून या परिसरात वाघिणीने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. सुरुवातीला त्या वाघिणीने पाळीव प्राण्यांवर हल्ला करत ठार केले. त्यानंतर विश्वनाथनगर आणि कोठारी येथील दोन जणांवर हल्ला करून जखमी केले. तर ७ जानेवारी रोजी चिंतलपेठ येथील सुषमा देवदास मंडल आणि १५ जानेवारी रोजी कोडसापूर येथील रमाबाई मुंजमकर या दोन महिलांचा बळी घेतला. या घटनांमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. वन विभागाने आरआरटी ला पाचारण करून १८ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास वाघिणीला जेरबंद केल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास घेतला. मात्र, वाघिणीला जेरबंद केलेल्या त्याच परिसरात जवळपास दोनशे मीटर अंतरावर पुन्हा एक मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. परंतु मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने वाघिणीला जेरबंद करण्याच्या अगोदर त्याने हल्ला करून ठार केला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या परिसरात नेमकी कीती वाघ आहेत ? आणि हि घटना नेमकी कधी घडली? असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद मुलचेरा तालुका अध्यक्ष सतीश पोरतेट यांनी नागरीकांना घाबरून न जाता आपण सतर्क राहावे असे आवाहन केले.
यावेळी उपस्थित ग्रामपंचायत मल्लेरा चे सरपंच अरुण करते,साईनाथ उरेते,महेंद्र आश्राम,केजीराव आरके,रवी उरेते,साईनाथ मडावी, दीपक गावडे,, विलास गावडे ,अनिल गावडे ,सुरेश मडावी ,रमेश गावडे प्रकाश गावडे ,संतोष सिडाम उपस्थित होते.