अधिवेशनाच्या तोंडावर सिरोंचा वनविभागातील गैरप्रकार पोहचली थेट वन मंत्र्याकडे

372

 

– सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांचे थेट तक्रार

सिरोंचा :जिल्ह्याचा शेवटचा टोक असलेल्या सिरोंचा वनविभागात मागील दोन वर्षापासून मौल्यवान वनसंपत्तीची प्रचंड हानी केली जात आहे. यासंदर्भात वरिष्ठ वनाधिका-यांकडे अनेकदा तक्रार दाखल करुनही ठोस उपाययोजना न झाल्याने सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी थेट नागपूर येथील वनभवन कार्यालय गाठून मौल्यवान वृक्षांची कत्तल थांबवून तस्करांच्या मुसक्या आवळण्यासोबतच बेजबाबदार वनाधिका-यांवर कारवाई करण्याची तक्रार प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभूर्णेकर यांचेकडे केली आहे.
सिरोंचा वनविभागांतर्गत आठ वनपरिक्षेत्र कार्यालय येत असून या जंगलात मौल्यवान सागवनासह गौणखनिज मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे तस्करांनी या उपवन क्षेत्राकडे नजरा वळवित दोन वर्षापासून गौणखनिज उत्खनन, वाहतूक तसेच मौल्यवान वृक्षांची तोड करुन परराज्यात तस्करी करीत आहेत. एकट्या कमलापूर वनपरिक्षेत्रात काही महिन्यांपूर्वी 30 ते 40 हेक्टर क्षेत्रातील मौल्यवान वृक्षे तोडल्या गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. राजरोसपणे वृक्षांची कत्तल होत असतांना जबाबदार अधिकारी असलेल्या सिरोंचा वनविभागाचे उपवनसंरक्षक मात्र याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी संबंधित तस्करांच्या मुसक्या आवळित संबंधित वनकर्मचा-यांसह अधिका-यांवरही निलंबनाची कार्यवाही करण्याची मागणी मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक कार्यालय गडचिरोली यांचेकडे केली होती. मात्र महिनाभराचा कालावधी लोटूनही ठोस कार्यवाही झाली नाही. परिणामी संतोष ताटीकोंडावार यांनी थेट नागपूर येथील वनभवन कार्यालय गाठित प्रधान मुख्य वनसंरक्षकांना निवेदन सादर केले. येत्या दहा दिवसात दोषी वनकर्मचारी निलंबनाच्या कारवाईसह बेजबाबदार उपमुख्यवनसंरक्षकांना पदावरुन न हटविल्यास वनभवन कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ताटीकोंडावार यांनी दिला आहे. सिरोंचा वनविभागातील वृक्ष कत्तलीची तक्रार थेट प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडे गेल्याने सदर प्रकरणी कुणावर आणि कोणती कार्यवाही होते, याकडे संपूर्ण वन्यप्रेमींसह जिल्हावासीयांच्या नजरा लागल्या आहेत.