अजब कारभार; पाहणी न करताच पुलाचे बांधकाम – सार्वजनीक बांधकाम विभागाचा प्रताप

213

 

– लंकाचेन नाल्यावरील पुल बांधकामाचे पितळ उघड

जिल्ह्याचा दुर्गम, अतिदुर्गम भाग विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र, राज्य शासन सातत्याने प्रयत्न सुरु आहे. याकरिता रस्ते, पुलाच्या माध्यमातून सदर भाग जोडल्या जात आहे. याकरिता कोट्यावधीचा निधी दरवर्षी खर्ची घातला जात आहे. मात्र प्रशासकीय अधिका-यांच्या अनास्थेमुळे जनतेच्या पैशाचे वाटोळे होत आहे. असाच प्रकार सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या लंकाचेन नाल्यावरील पुल बांधकामात उघडकीस आला आहे. संबंधित अधिका-यांनी बांधकाम स्थळाची पाहणी न करताच कामाची निविदा प्रक्रिया पार पाडली. मात्र पुल निर्मितीची लांबी जास्त असल्याने संबंधित कंत्राटदाराने प्राप्त निधीत काम कसेबसे आटोपून घेतले. परिणामी कंत्राटदाराच्या निकृष्ट बांधकामाचे पितळ अल्पाविधीतच उघडे पडले आहे.
सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या लंकाचेन नाल्यावर पुल नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात या भागाला पुराचा फटका बसत आला आहे. या भागातील नागरिकांची समस्या लक्षात घेत पुल निर्मितीसाठी शासनद्वारे निधी मंजूर करण्यात आला. याअंतर्गत सार्वजनीक बांधकाम विभागाद्वारे निविदा मागितली. मात्र साबां विभागाच्या अधिका-यांनी घटनास्थळी पाहणी करताच पुल बांधकामाची निविदा काढली. प्राप्त निधीअंतर्गत संबंधित कंत्राटदाराने पुलाच्या बांधकामास सुरुवात केली. मात्र प्रत्यक्षात पुलाची लांबी जास्त असल्याने सदर निधीत बांधकाम पूर्ण होणे शक्य नव्हते. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराने निकृष्ट साहित्याचा वापर करुन पूलाचे काम कसेबसे पूर्ण केले. प्रत्यक्षात नाल्याची लांबी अधिक असतांना कमी लांबीचा पुल बांधकामाची निविदा कशी काय काढण्यात आली? हा संशोधनाचा विषय ठरला आहे.
निकृष्ट बांधकामामुळे यंदाच्या पावसाळ्यातही या भागातील गावांना पुराचा फटका बसला. सद्यस्थितीत या मार्गावरील रस्त्यासह पुलाची वाट लागल्याने वाहतूक विस्कळीत पडली आहे. प्रत्यक्ष मौकास्थळी न जाता साबां विभागाच्या अधिका-यांद्वारे एसीच्या कॅबीनमध्ये बसून कामे करवून घेतल्या जात असल्यानेच निकृष्ट कामे होत असल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे. यास जबाबदार संबंधित अधिका-यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
बॉक्ससाठी…
साबांच्या वरिष्ठ अधिका-यांवर गुन्हे दाखल करा
सदर पुलाच्या बांधकामादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिले असते तर आज या पुलावरील वाहतूक सुरळित सुरु असती. योग्य लांबीमध्ये पुलाचे बांधकाम करून घेणे ही साबां विभागाची जबाबदारी होती. मात्र त्यांनी याकडे कानाडोळा केल्यानेच पावसाळ्यात पुर परिस्थितीत येथील नागरिकांपर्यंत मदत पोहचविता आली नाही. यासाठी सर्वस्वी जबाबदारी साबां विभागाचे वरिष्ठ अधिकारी असून त्यांचेवर फौजदारी गुन्हा नोंद करावा.
संतोष ताटीकोंडावार, सामाजिक कार्यकर्ते