अवैध सावकारीत गुंतलेल्या छोट्या बागडबिल्ल्याच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी देसाईगंज सिटीझन फोरमचे अध्यक्ष किशोर कऱ्हाडेची संबंधित विभागाकडे मागणी

109

देसाईगंज-
कोणे एकेकाळी एकवेळच्या खाण्याचे वांदे असलेल्या देसाईगंज शहरातील छोटा बागडबिल्ला या नावाने प्रसिद्ध असलेल्या व गडचिरोली जिल्ह्यातील सिएमआर मिलींग गैरव्यवहार प्रकरणातील मास्टरमाईंड असलेल्या व्यक्तीने आधी बाजारात नकली नोटं चालवून व अवैध सावकारीच्या माध्यमातून तसेच सिएमआर मिलींग गैरव्यवहारात स्थानिक अधिकाऱ्यांना हाताशी धरून अल्पावधित कोट्यावधिची संपत्ती अर्जीत करणाऱ्या ‘मायाप्रेमी’च्या संपुर्ण संपत्तीची चौकशी करून दोषी आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देसाईगंज सिटीझन फोरमचे अध्यक्ष किशोर कऱ्हाडे यांनी संबंधित विभागाकडे सबळ पुराव्याच्या आधारे केली असल्याने शहरात चांगलीच खळबळ माजली आहे.
दिलेल्या तक्रारीत कऱ्हाडे यांनी नमूद केले आहे की देसाईगंज शहरातील कथित राईसमिलर्सकडे एक वेळच्या खाण्याचे वांदे असतांना आरमोरी येथील एका सावकाराकडून एक टक्के व्याज दराने रक्कम आणुन देसाईगंज शहरातील गरजुंना तीन टक्के व्याजाने देऊन येत असलेल्या रकमेतून कडधान्य खरेदीचा व्यवसाय करीत होता.दरम्यान कडधान्य विकण्यासाठी आणणाऱ्या एका शेतकऱ्याला नकली नोटं दिल्याचे तो शेतकरी मिरची बाजारात मिरच्या खरेदी करण्यासाठी गेला असता नकली नोटा दिल्याचे बिंग फुटले होते.दरम्यान प्रकरण चव्हाट्यावर येऊ नये करीता लागलीच सारवासारव करून प्रकरण दाबुन टाकण्यात आले होते.यावरून सदर छोटा बागडबिल्ल्याने नकली नोटं चालवून व अवैध सावकारकीच्या माध्यमातून कोट्यावधीची माया अर्जीत करून अल्पावधित कोट्यावधिचा देसाईगंज- ब्रम्हपुरी मार्गावर बंगला बांधला आहे.
शासकीय स्तरावरुन आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत धान खरेदी करून भरडाई करीता देण्यात येत असतांना सदर छोटा बागडबिल्ल्याने भरडाई योजनेत स्थानिक अधिकाऱ्यांचे खिसे गरम करून आधी प्रवेश मिळवून उचल केलेल्या धानाची भरडाई न करता परस्पर खुल्या बाजारात विक्री करून या गोरखधंद्याच्या आड शासनाकडून वाहतुक भाडा, भरडाई खर्च वसूल करण्याचा सपाटा सुरु केला. अधिकाऱ्यांना हाताशी धरून मिलची वाढीव भरडाई क्षमता दाखवून क्षमतेपेक्षा जास्त धानाची उचल करून उचल केलेला धान परस्पर खुल्या बाजारात विक्री करून शुद्ध नफा कमावला.आपल्याच पावलावर पाऊल ठेवून मनाप्रमाणे वागणाऱ्या राईसमिलर्सना बोगस कागदपत्रांच्या आधारे सिएमआर मिलींग करीता धान मिळवून देण्यासाठी आधी धानाची उचल करण्याकरीता प्रती लाॅट ४५ हजार रुपये व नंतर मानवी खाण्यास अयोग्य असलेला खुल्या बाजारातून उचल केलेला धान शासन जमा करण्याकरीता ४५ हजार रुपये प्रती लाॅट याप्रमाणे एका लाॅटवर तब्बल ९० हजार रुपये कमाई करून संबंधित अधिकाऱ्यांना नाममात्र सुखरूप वाटा पोहचता करीत येत आहे.
या माध्यमातून संबंधित विभागाच्या काही स्थानिक अधिकाऱ्यांना सुरुवातीला रक्कम बरोबर भेटत गेल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी विश्वास बसत गेल्याने मोठी रक्कम छोट्या बागडबिल्ल्याकडेच ठेवणे पसंत केले.कार्यकाळ पूर्ण होऊन स्थानांतरण झाल्यास हवालाच्या माध्यमातून रक्कम पोहचती केल्या जात असल्याने अनेकांनी मोठी रक्कम जमा ठेवणेच पसंत केले.मात्र काही अधिकाऱ्यांचे स्थानांतरण होताच जमा रक्कम देण्यास नकार देऊन सदर रक्कमही हडपून संबंधित अधिकाऱ्याने वाच्यता करण्याचा प्रयत्न केल्यास ऑडिओ रेकॉर्डींग व्हायरल करण्याची धमकी देऊन चुप केल्याचे सांगीतले जात असल्याने या माध्यमातूनही कोट्यावधीची रक्कम हडपली असल्याची दाट शक्यता आहे.
एकुणच अल्प वयात कोट्याधिश बनून केलेले पाप लपवण्यासाठी आता सत्ताधाऱ्यांच्या मागे लपत असुन काहीच वर्षापुर्वी एक वेळचे खाण्याचे वांदे असलेल्या छोट्या बागडबिल्ल्याची एकुण अर्जीत केलेल्या संपत्तीची सखोल चौकशी केल्यास मोठे घबाड उघडकिस येण्याची दाट शक्यता आहे.अवैध सावकारीशी संबंधितही चौकशी करण्यात आल्यास सदर बागडबिल्ल्याने अनेकांकडून कोरा चेक,सह्या घेतलेले कोरे स्टॅम्प पेपर, जमिनीचे तसेच मालमत्तेचे कागदपत्र आढळून येण्याची दाट शक्यता आहे.सदर बागडबिल्ल्याने अनेकांकडून अव्वाच्या सव्वा व्याज दराने रक्कम उखळल्याचे वास्तव असल्याने कोट्यावधिची बेकायदेशीर संपत्ती आढळून येण्याची दाट शक्यता लक्षात घेता अवैध सावकारीत गुंतलेल्या व सिएमआर मिलींग मध्ये प्रचंड गैरव्यवहार करून अल्पावधित कोट्याधिश बनलेल्या छोट्या बागडबिल्ल्याच्या एकुणच संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.