अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी
हेडरी (ता. एटापल्ली, जि. गडचिरोली) : केंद्रीय राखीव पोलीस बल (सीआरपीएफ) च्या सी/१९१ वी वाहिनीच्या वतीने १७ फेब्रुवारी २०२६ रोजी हेडरी येथे सिविक ऍक्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वामपंथी उग्रवादग्रस्त भागातील नागरिकांशी सलोखा वाढवणे आणि विकासाच्या मुख्य प्रवाहाशी त्यांना जोडणे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमास पोलिस उपमहानिरीक्षक (परिचालन) गडचिरोली अजय कुमार शर्मा, कमांडंट सत्यप्रकाश, द्वितीय कमान अधिकारी राजीव रंजन कुमार सिंह, उपकमांडंट उमाशंकर प्रसाद तसेच पोलिस उपविभागीय अधिकारी योगेश रांजणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते बिरसा मुंडा व कांतिसूर्य बाबूराव सेडमाके यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आदिवासी समाजातील थोर व्यक्तिमत्त्वांना अभिवादन करून सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला.
या सिविक ऍक्शन कार्यक्रमांतर्गत हेडरी परिसरातील हेडरी, मंगेर, पुरसलगोंदी रेकनार, मल्लमपाडी, सुरजागड, पामाजीगुडा, आलेंगा, ईल्लुर, इतुलनार, नेंडेर, बोडमेटा आणि गोडेली आदी गावांतील सुमारे ३०० ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमादरम्यान गरजू नागरिकांना ब्लँकेट, संगणक साहित्य, शालेय पुस्तके, पेन ड्राइव्ह यांसारख्या दैनंदिन उपयोगाच्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विशेषतः विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून आले.
यावेळी उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे नियोजन सुयोग्य पद्धतीने करण्यात आले होते. स्थानिक ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे स्वागत करत सीआरपीएफच्या प्रयत्नांचे कौतुक केले. दुर्गम व नक्षलग्रस्त भागात अशा उपक्रमांमुळे प्रशासन व नागरिक यांच्यातील दरी कमी होण्यास मदत होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
मार्गदर्शन करताना अजय कुमार शर्मा यांनी सांगितले की, वामपंथी उग्रवादग्रस्त भागातील युवक-युवतींच्या आकांक्षा वाढवणे, आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे आणि पोलिस-जनता यांच्यात विश्वासाचे नाते अधिक दृढ करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. सुरक्षा दल केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यापुरते मर्यादित नसून सामाजिक बांधिलकीही जपत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशा उपक्रमांमुळे युवकांना शिक्षण, क्रीडा व रोजगाराच्या संधींबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होतो, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी सहायक कमांडंट संतोष प्रल्हाद दरांगे व साकेत विक्रम सिंह यांनी उपस्थित ग्रामस्थ, विद्यार्थी व पत्रकारांचे आभार मानले. स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याचे त्यांनी सांगितले.
एकूणच, सीआरपीएफच्या सिविक अॅक्शन कार्यक्रमामुळे हेडरी परिसरातील नागरिकांना आवश्यक साहित्याची मदत मिळाली असून पोलिस-जनता संबंध अधिक दृढ होण्यास सकारात्मक चालना मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. दुर्गम भागातील विकासासाठी अशा उपक्रमांची सातत्याने आवश्यकता असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.







