जेएसडब्ल्यू प्रकल्पाविरोधात संताप तीव्र; माओवाद्यांच्या नावाने धमकीपत्रे आढळल्याने खळबळ

843

अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी

एटापल्ली : तालुक्यातील वटेली परिसरात सुरू असलेल्या जेएसडब्ल्यू कंपनीच्या प्रस्तावित प्रकल्पाला स्थानिक स्तरावर वाढता विरोध होत असतानाच माओवाद्यांच्या नावाने धमकीचे पत्रक आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या पत्रकांमध्ये कंपनीच्या कामाला विरोध दर्शवत काही अधिकाऱ्यांना इशारा देण्यात आल्याचे सांगितले जात असून, घटनेनंतर पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने चौकशी सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वेटली परिसरात काही दिवसांपासून जेएसडब्ल्यू कंपनीच्या कामाविरोधात विविध स्तरांवर नाराजी व्यक्त केली जात आहे. स्थानिकांना विश्वासात न घेता बाहेरील व्यक्तींना कामावर घेतले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. तसेच रस्ते व ड्रिलिंगच्या कामांमुळे गावातील वातावरण बिघडत असल्याचेही बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी आंदोलनाची चर्चा सुरू असतानाच जंगल परिसरात लाल शाईने लिहिलेले धमकीचे पत्रक आढळून आले. पत्रकात कंपनीच्या कामाला विरोध करत संबंधित अधिकाऱ्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला. पत्रके नेमकी कोणी लावली, त्यामागे कोणाचा हात आहे, तसेच परिसरात माओवादी हालचाली वाढल्या आहेत का याचा शोध पोलिस घेत आहेत. स्थानिक नागरिकांशी संवाद साधून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे. काही ग्रामस्थांनी मात्र या प्रकारामागे बाहेरील व्यक्तींचा हात असू शकतो, अशी शंका व्यक्त केली आहे. दुसरीकडे, कंपनीविरोधातील वाढता रोष आणि अचानक समोर आलेली धमकीपत्रे यामुळे प्रशासनासाठी नवे आव्हान निर्माण झाले आहे.

दरम्यान, या घटनेमुळे वटेली व परिसरातील गावांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. काही सामाजिक संघटनांनी स्थानिकांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे. विकासकामे करताना स्थानिकांना प्राधान्य देणे, पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास करणे आणि ग्रामसभेची संमती घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. सध्या संपूर्ण परिसरात पोलिसांकडून विशेष नजर ठेवण्यात येत असून, पुढील तपास सुरू आहे.

“प्राथमिक माहितीनुसार या भागात नक्षलवादी हालचाली आढळून आलेल्या नाहीत. तसेच स्थानिक नागरिकांकडूनही प्रकल्पाला ठोस विरोध दिसून आला नाही. त्यामुुळे बाहेरील व्यक्तीने हेतुपुरस्सर हे कृत्य केले असावे. असा संशय आहे. प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.”

योगेश रांजनकर,
उपविभागीय पोलीस अधिकारी, हेडरी