भर दिवसा कारला भीषण आग; थोडक्यात मोठा अनर्थ टळला

196

ब्रेकिंग न्यूज

उप संपादक : तेजेश गुज्जलवार

देसाईगंज : भर दुपारी कारच्या इंजिनमध्ये अचानक आग लागल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, प्रसंगावधान राखत गाडीतून सर्व प्रवासी बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, देसाईगंज येथील अंकुश विजय आईटलवार (रा. राजेंद्र वार्ड, देसाईगंज) हे अर्जुनी येथे हाडांच्या उपचारासाठी गेले होते. उपचार आटोपून ते परत देसाईगंजकडे येत असताना एकलपूर फाटा आणि वनविभागाच्या नाक्याजवळ त्यांच्या अल्टो (MH 12 CD 9819) या कारच्या इंजिनमधून अचानक धूर निघू लागला.
स्थितीचे गांभीर्य ओळखून गाडीत असलेले पाचही जण तत्काळ बाहेर उतरले. काही क्षणांतच इंजिनने पेट घेतला आणि आग भीषण स्वरूप धारण करू लागली. ही घटना दुपारी सुमारे ४ वाजताच्या सुमारास घडली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मात्र, या आगीत कारचे सुमारे ₹९०,००० इतके नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठा अनर्थ टळला आहे.