पत्नीने पतीच्या हत्येसाठी दिली सुपारी; चौघांना अटक पेंशन व नोकरीच्या आमिषातून कट रचल्याची धक्कादायक माहिती

1030

चामोर्शी (प्रतिनिधी) – तालुक्यातील घोडपेठ परिसरात घडलेल्या शिक्षक रविंद्र तुळशीराम कुळमेथे (वय ४६, रा. मुधोली चेक नं. ०२) यांच्या खुनाच्या प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. या हत्येमागे स्वतः पत्नीचाच हात असल्याचे समोर आले असून, तिनेच एक लाख रुपयांची सुपारी देऊन पतीची हत्या घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपमाला कुळमेथे हिने नागपूर येथील वर्षा परचाके हिच्या माध्यमातून दोन आरोपींना सुपारी दिली. आरोपींनी रविंद्र कुळमेथे यांना घोडपेठ परिसरातील सुनसान ठिकाणी कारमध्ये नेऊन गळा आवळून ठार मारले. त्यानंतर मृतदेह घटनास्थळी टाकून ते फरार झाले.
घटनेनंतर मोबाईल लोकेशन, पत्नीचे संशयास्पद हालचाली आणि तांत्रिक तपासाच्या आधारे भद्रावती पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी चार आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये पत्नी दीपमाला कुळमेथे, वर्षा परचाके (रा. मानेवाडा, नागपूर), सोनू उर्फ प्रवीण नरेंद्र काळोकार (रा. दाहोडा, ता. रामटेक) आणि नजीर नसरुल अन्सारी (रा. कळमेश्वर फाटा, नागपूर) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मारुती झेन स्टिलो कार (एमएच ३१ डीसी ८९१९) आणि तीन मोबाईल जप्त केले आहेत. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०३(२), १४०(२), ६१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या हत्येमागे आर्थिक हेतू असल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून, पतीच्या मृत्यूनंतर मिळणारी पेन्शन व मुलांना नोकरीची संधी मिळावी या उद्देशानेच सुपारी देण्यात आल्याची गोपनीय माहिती पुढे येत आहे.
गावकऱ्यांची प्रतिक्रिया
मुधोली चेक नं. ०२ येथील गावकऱ्यांनी व्यक्त केलेल्या भावनिक प्रतिक्रियेनुसार, दिवंगत रविंद्र कुळमेथे हे अत्यंत शांत, मनमिळाऊ व सर्वांशी जिव्हाळ्याने वागणारे व्यक्तिमत्व होते. ते नेहमी लोकांसोबत चांगले संबंध ठेवत असत तसेच आपल्या आई-वडिलांची सेवा करत होते. गावात त्यांचे कोणाशीही वैर किंवा वाद नव्हता. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली असून, अशा व्यक्तीची अशा प्रकारे हत्या होणे अत्यंत धक्कादायक असल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.
पोलिस अधिक तपास करीत आहेत.