एटापल्ली वनपरिक्षेत्राची धडक कारवाई : अवैध सागवानासह ९.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

690

अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी

एटापल्ली, दि. ३० एप्रिल : भामरागड वनविभागांतर्गत एटापल्ली वनपरिक्षेत्राने अवैध सागवान तस्करीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल ९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत सागवान चिरणासह एक पिकअप वाहन ताब्यात घेण्यात आले असून वनतस्करांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एटापल्ली वनपरिक्षेत्रातील नेनवाडी नियतक्षेत्रात वनरक्षक श्रीमती सुशीला आतला या नियमित गस्तीदरम्यान संशयास्पद हालचाली दिसून आल्या. CG-05-D-1307 क्रमांकाचे पिकअप वाहन नेनवाडीहून पाखांजूरच्या दिशेने जात असल्याचे आढळून आले. वाहनाची तपासणी केली असता त्यात सुमारे १.२३३ घनमीटर सागवान चिरण आढळले.

यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कारवाईदरम्यान सुमारे १ लाख ४५ हजार १४५ रुपयांचे सागवान चिरण आणि ८ लाख रुपये किंमतीचे पिकअप वाहन असा एकूण ९.५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी संबंधितांविरोधात वनगुन्हा नोंदविण्यात आला आहे.

एटापल्ली परिसर महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर असल्याने बाहेरील राज्यातील काही लाकूड व्यापारी स्थानिक नागरिकांना आमिष दाखवून अवैध वृक्षतोड व तस्करीस प्रवृत्त करतात, अशी माहिती समोर येत आहे. यापूर्वीही जिजावडी, हेटाळकसा व घनपाडी परिसरात अशा प्रकारच्या कारवाया करण्यात आल्या होत्या.

ही संपूर्ण कारवाई उपवनसंरक्षक शैलेश मीना व सहाय्यक वनसंरक्षक डी. जी. रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यात वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती एन. के. खोब्रागडे, वनपाल बी. डी. नागोसे, एस. एल. तोराम, के. डी. मडावी, पी. बी. सोयाम, ए. एस. उईके यांच्यासह वनरक्षकांनी संयुक्तरीत्या सहभाग घेतला.

वनविभागाच्या या धडक कारवाईमुळे अवैध सागवान तस्करीला मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.