एटापल्लीत ‘आम्ही सावित्रीच्या लेकी’ समूहाची पाणपोई सेवा सुरू; महिलांचा आदर्श उपक्रम

123

अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी

एटापल्ली : तालुक्यातील महिलांच्या पुढाकारातून समाजोपयोगी उपक्रमांना चालना मिळत असल्याचे प्रेरणादायी उदाहरण नुकतेच समोर आले आहे. “आम्ही सावित्रीच्या लेकी समूह, एटापल्ली” यांच्या वतीने नागरिकांसाठी बस स्टॅन्ड वर पाणपोई सेवा सुरू करण्यात आली असून, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारा ठरत आहे.

सदर पाणपोई सेवेचे उद्घाटन साध्या पण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. यावेळी समूहातील महिलांनी एकत्र येत समाजहिताचा संदेश दिला. “पाणपोई सेवा” या फलकाखाली थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून,शाळकरी मुले, प्रवासी, मजूर, दुकानदार तसेच स्थानिक नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे त्रस्त नागरिकांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रमुख महिलांमध्ये पौर्णिमा श्रीरामवार , गुलशन शेख, कलीमा शेख, रेहाना शेख, सुनीता चांदेकर, शालिनी नैताम, वंदना उपगन्लावार,बेबीताई नरोटी,निर्मलाताई हिचामी, सरिता गावडे, पुजाताई गहिरवार आदींचा समावेश असून, सर्वांनी मिळून ही पाणपोई उभी केली आहे. दररोज पाण्याची स्वच्छता, पाण्याची भांडी भरणे तसेच येणाऱ्या-जाणाऱ्यांना पाणी देण्याची जबाबदारी त्या स्विकारल्या आहेत.

कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत महिलांच्या कार्याला सलाम केला. “आम्ही सावित्रीच्या लेकी” या नावाप्रमाणेच महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत समाजासाठी आदर्श निर्माण केला आहे, असे मत व्यक्त करण्यात आले. अशा उपक्रमांमुळे समाजात एकोपा वाढतो व इतरांनाही प्रेरणा मिळते, असेही सांगण्यात आले.

स्थानिक नागरिकांनीही या पाणपोई सेवेचे स्वागत केले असून, उन्हाळ्यातील कठीण काळात ही सुविधा अत्यंत गरजेची असल्याचे मत व्यक्त केले. अनेकांनी महिलांच्या या उपक्रमाला आर्थिक व नैतिक पाठबळ देण्याची तयारी दर्शवली आहे.

एकूणच, एटापल्लीतील “आम्ही सावित्रीच्या लेकी समूह” यांचा हा उपक्रम केवळ पाण्याची सुविधा देणारा नसून, समाजातील एकात्मता, सहकार्य आणि सेवाभाव यांचे जिवंत उदाहरण ठरत आहे. भविष्यातही असेच उपक्रम राबवून समाजहित साधण्याचा त्यांचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.