अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी
एटापल्ली, दि. ५ जून २०२६ : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून एटापल्ली येथील फॉरेस्ट नर्सरी व गार्डन परिसरात वन विभागाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासह वृक्ष लागवडीचे महत्त्व नागरिकांमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
सदर वृक्षारोपण कार्यक्रम एटापल्ली तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रविंद्र रामगुंडेवार, पत्रकार अमित कत्तीवार, तेजेश गुज्जलवार तसेच राकेश तेलकुंटलवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली. वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि हवामानातील बदल यामुळे पर्यावरणासमोर गंभीर आव्हाने निर्माण झाली असून त्यावर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड आणि वृक्षसंवर्धन आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. वृक्ष हे केवळ पर्यावरणाचा समतोल राखत नाहीत, तर भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ आणि निरोगी जीवनाचा आधार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
उपस्थित मान्यवरांनी विविध प्रकारच्या रोपांची लागवड करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. वृक्षारोपणासोबतच लागवड केलेल्या रोपांचे संगोपन करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला. पर्यावरणाचे रक्षण ही केवळ शासकीय यंत्रणेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने आपली सामाजिक बांधिलकी म्हणून वृक्ष लागवड व संवर्धनात सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले.
हा कार्यक्रम वन परिक्षेत्र अधिकारी (RFO) नीलिमा खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी वन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. तसेच जंगलांचे संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि हरित क्षेत्र वाढविण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वन विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमस्थळी वृक्षारोपणासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. वृक्षारोपणानंतर उपस्थितांनी पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ घेतली आणि अधिकाधिक वृक्ष लागवड करण्याचा निर्धार व्यक्त केला.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती निर्माण करणारा ठरला. समाजातील विविध घटकांच्या सहभागामुळे वृक्षारोपणासारख्या उपक्रमांना अधिक बळ मिळत असून भविष्यातही अशा कार्यक्रमांद्वारे हरित एटापल्ली घडविण्याचा संकल्प वन विभागाने व्यक्त केला. पर्यावरणाचे रक्षण आणि नैसर्गिक संसाधनांचे जतन करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतल्यासच आगामी पिढ्यांसाठी सुरक्षित व समृद्ध पर्यावरण निर्माण होईल, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.







