एटापल्लीजवळ भीषण अपघात; इनोव्हा क्रिस्टाच्या धडकेत दुचाकी वरील एक तरुण जागीच ठार, तर एक तरुण गंभीर जखमी

2688

उप संपादक:तेजेश गुज्जलवार
एटापल्ली, दि. ४ जून : एटापल्ली तालुक्यात पुन्हा एकदा भरधाव वाहनाच्या धडकेत निष्पाप तरुणाचा जीव गेल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एटापल्ली पासून सुमारे ७ किलोमीटर अंतरावरील आलदांडी गावाजवळ गुरुवारी झालेल्या भीषण अपघातात परसलगोंदी येथील एका २८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा साथीदार गंभीर जखमी असून मृत्यूशी झुंज देत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, MH 34 CD 0800 क्रमांकाची इनोव्हा क्रिस्टा गाडी भरधाव वेगाने जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
या अपघातात अनिल हिचामी (वय २८, रा. पार्सलगोंदी) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे, धडकेचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेला होता. अपघातानंतर रस्त्यावर मोठी गर्दी जमली आणि नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.
अपघातात गंभीर जखमी झालेला बालाजी दुर्वा (रा. पार्सलगोंदी) याला प्रथम एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
घटनेची माहिती मिळताच आलदांडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. अपघाताचे नेमके कारण, वाहनाचा वेग तसेच चालकाची निष्काळजीपणा याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे पार्सलगोंदी गावावर शोककळा पसरली असून नातेवाईक व ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे. वाढत्या रस्ते अपघातांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून भरधाव वाहनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पुढील तपास आलदांडी पोलीस करीत आहेत.