इन्स्टाग्रामवरील समलैंगिक प्रेमाचा रक्तरंजित शेवट; लग्नास नकार दिल्याने मित्राचा गळा चिरून खून

124

उप संपादक : तेजेश गुज्जलवार

एटापल्ली : सोशल मीडियावर झालेली ओळख, त्यातून निर्माण झालेले प्रेमसंबंध आणि लग्नास मिळालेला नकार यामुळे एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना एटापल्ली तालुक्यात उघडकीस आली आहे. हालेवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवदा गावाजवळ 31 मे रोजी सकाळी सुमारे 7 वाजता हा थरार घडला.
मृतक सतीशकुमार जगदीशप्रकाश निसाद (35, रा. नागेपल्ली, ता. अहेरी) यांचा नागेपल्ली येथे गॅरेज व्यवसाय होता. तर आरोपी सूरज मार्गान हलदार (27, रा. रायघर, जि. नबरंगपूर, ओडिशा) याला नागरिकांनी घटनास्थळीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, सतीशकुमार आणि सूरज यांची काही महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. ही ओळख पुढे मैत्रीत आणि नंतर प्रेमसंबंधांत बदलली. आरोपी सूरजने सतीशकुमारकडे लग्नाचा आग्रह धरला होता. मात्र सतीशकुमार विवाहित असल्याने त्याने लग्नास नकार दिला होता.
दोन दिवसांपूर्वी सूरज ओडिशातून नागेपल्ली येथे आला होता. रविवारी पहाटे तो परत जात असताना सतीशकुमार त्याला आपल्या कारने सोडण्यासाठी निघाला होता. देवदा गावाजवळ पोहोचताच दोघांमध्ये लग्नाच्या मुद्द्यावरून जोरदार वाद झाला. यावेळी संतापाच्या भरात आरोपीने सोबत आणलेल्या धारदार चाकूने सतीशकुमारवर सपासप वार करत त्याचा गळा चिरल्याची माहिती समोर आली आहे.
घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला युवक पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तत्काळ धाव घेत आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपीवर सध्या एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे