डांबर प्लांटमध्ये विषारी कोब्राची दहशत; सर्पमित्रांच्या धाडसी रेस्क्यूमुळे मोठा अनर्थ टळला

285

उप संपादक :तेजेश गुज्जलवार

एटापल्ली, दि. २ जून २०२६ :

एटापल्ली: तालुक्यातील बंटीभाऊ मोहरले यांच्या डांबर प्लांट परिसरात सोमवारी सकाळी विषारी कोब्रा साप आढळल्याने कामगार आणि नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.
साप असल्याची माहिती मिळताच त्रिवेणी अर्थ मूव्हर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे वन्यजीव तज्ज्ञ श्री. कुमरी स्वामी सर व श्री. निक्षेपन सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षित सर्पमित्र शशांक नामेवार आणि तेजेश एल. गुज्जलवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर सर्पमित्रांनी अत्यंत सावधगिरी आणि कौशल्याचा परिचय देत विषारी कोब्रा सापाचे यशस्वी रेस्क्यू केले. रेस्क्यूची कारवाई पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सापाला कोणतीही इजा न करता सुरक्षितपणे पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
या धाडसी आणि यशस्वी मोहिमेमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. वन्यजीव तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणाऱ्या सर्पमित्रांच्या तत्परतेचे नागरिकांनी विशेष कौतुक केले.
यावेळी सर्पमित्रांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन करत सांगितले की, साप दिसल्यास घाबरून जाऊ नये किंवा त्याला मारण्याचा प्रयत्न करू नये. तत्काळ प्रशिक्षित सर्पमित्र अथवा वन विभागाशी संपर्क साधून सुरक्षित रेस्क्यू करून घ्यावे.
वन्यजीव संरक्षण आणि मानव-सर्प संघर्ष टाळण्यासाठी जनजागृती अत्यंत आवश्यक असून अशा रेस्क्यू मोहिमा पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.