ख्रिश्चन धर्मांतर प्रकरणाची चौकशी करून कार्यवाहीची मागणी तुमरगुंडा ग्रामसभेचे मुख्यमंत्री व प्रशासनाला नायब तहसिलदार प्रविण चौधरी यानां निवेदण देतांना

461

अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी

एटापल्ली, दि. ५ जून २०२६ : एटापल्ली तालुक्यातील तुमरगुंडा ग्रामसभेने गावातील कथित ख्रिश्चन धर्मांतर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी राज्य शासन व जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. याबाबत मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, तुमरगुंडा हे आदिम माडिया जमातीचे (PVTG) गाव असून येथील आदिवासी समाज पारंपरिक रितीरिवाज, संस्कृती आणि श्रद्धांचे पालन करत आला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून गावात व परिसरात ख्रिश्चन धर्माचा प्रचार वाढल्याचा आरोप ग्रामसभेने केला आहे. या प्रचारामुळे काही आदिवासी बांधवांनी धर्मांतर केल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

ग्रामसभेच्या म्हणण्यानुसार, धर्मांतरित झालेल्या व्यक्तींकडून विविध धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, विवाह, गृहप्रवेश तसेच इतर सामाजिक उपक्रमांमध्ये ख्रिश्चन धर्माच्या प्रथा-परंपरांचा अवलंब केला जात आहे. त्यामुळे आदिवासी समाजाच्या पारंपरिक संस्कृती, बोलीभाषा आणि सामाजिक एकात्मतेवर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

निवेदनात शासनाच्या वन विभागाच्या जमिनीवर उभारण्यात आलेल्या कथित चर्चची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच धर्मांतर झालेल्या व्यक्तींना मिळालेली जात प्रमाणपत्रे, आदिवासी प्रमाणपत्रे आणि इतर शासकीय लाभांची पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. धर्मांतरानंतरही आदिवासी समाजाच्या नावाने विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला जात असल्याचा आरोप ग्रामसभेने केला आहे.

भारतीय जनगणना २०२६-२७ मध्ये धर्माची नोंद करताना संबंधित व्यक्तींच्या वास्तविक धर्माची नोंद करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच गावातील सर्व धर्मांतर प्रकरणांची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम राबवावी, असे ग्रामसभेचे म्हणणे आहे.

ग्रामसभेने महाराष्ट्र शासनाने धर्मांतरविरोधी कायद्याबाबत सुरू केलेल्या चर्चेचे स्वागत करत, आदिवासी समाजाच्या पारंपरिक ओळखीचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. आदिम माडिया जमातीच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी शासनाने हस्तक्षेप करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

या निवेदनामुळे तुमरगुंडा परिसरातील धर्मांतराच्या मुद्द्याला पुन्हा एकदा वाचा फुटली असून, प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.