भाग्यश्रीताई आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली हॉटेल व्यावसायिकांच्या समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

177

दिनांक : २४ मार्च २०२६
अहेरी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांबाबत *माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर)* यांच्या मार्गदर्शनाखाली मा.तहसीलदार साहेब यांच्या मार्फत, मा.जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अहेरी तालुकासह जिल्ह्यातील अनेक हॉटेल व्यावसायिक आपला उदरनिर्वाह हॉटेल व्यवसायावर चालवत आहेत. मात्र सध्या कमर्शियल गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वेळेवर गॅस उपलब्ध होत नसल्याने अनेक हॉटेल बंद पडण्याची वेळ येत असून हॉटेल मालक व कर्मचारी यांच्या रोजगारावरही परिणाम होत आहे.

तसेच गडचिरोली जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागांमध्ये मोबाईल नेटवर्क व इंटरनेट सुविधा अपुरी असल्याने घरगुती LPG सिलेंडर मिळवण्यासाठी आवश्यक असलेली ऑनलाईन प्रक्रिया (OTP पडताळणी) पूर्ण करणे नागरिकांना शक्य होत नाही. त्यामुळे नागरिकांना ४० ते ५० किमी अंतर पार करून तालुका मुख्यालयात जावे लागत असून त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

याशिवाय जिल्ह्यातील अनेक पेट्रोल व डिझेल पंपांवर उपलब्ध इंधन साठ्याबाबत स्पष्ट माहिती नसल्याने ग्रामीण भागातील नागरिक व शेतकऱ्यांना अनावश्यक धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे कमर्शियल गॅस सिलेंडर नियमित व पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत, दुर्गम भागात LPG सिलेंडरचे ऑफलाईन वाटप सुरू करावे तसेच पेट्रोल-डिझेल पंपांवर उपलब्ध साठ्याची माहिती दर्शविणारे फलक लावावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा *भाग्यश्रीताई आत्राम* यांच्या नेतृत्वाखाली हॉटेल व्यावसायिक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

यावेळी श्रीनिवास वीरगोनवार तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट अमोलजी मुक्कावार (नगरसेवक, न.प. अहेरी), श्रीनिवासजी चटारे (नगरसेवक, न.प. अहेरी), संदिपजी गुमलवार, कमलेशजी मेहता, अब्दुल रहमान शेख, सुमित मोतकुरवार, अनुरागजी बेझुलवार, चेतनजी सातपुते, किशोरजी मेहता, क्रीष्णाजी मंचालवार, क्रीष्णाजी बोरेवार, बाबुरावजी गणलावार, राकेशजी गणलावार, अमोल रामटेके, अरुण रामटेके, श्रीकांतजी कोतकोंडावर, श्याम मडावी व शरीफ शेख बच्चुय्या पोरते उपस्थित होते.