शहीद चिन्ना वेंटा यांच्या स्मृतींना उजाळा; पोलिस अधिकारी व ग्रामस्थांची उपस्थिती

333

मौजा कृष्णार येथे शूरवीर सी -60 कमांडर शहीद चिन्ना वेंटा यांच्या स्मृतिदिनानिमित्य आदरांजली अर्पण

अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी

एटापल्ली : तालुक्यातील मौजा कृष्णार येथे शूरवीर सी-६० कमांडर शहीद श्री चिन्ना वेंटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज दिनांक 19 मे 2026 रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात पोलिस अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या या वीर जवानाच्या स्मृतींना अभिवादन करत संपूर्ण परिसर भावूक झाला होता.

शहीद चिन्ना वेंटा हे नाव एकेकाळी नक्षलवाद्यांसाठी धडकी भरवणारे मानले जात होते. सी-६० पथकातील धाडसी आणि पराक्रमी कमांडर म्हणून त्यांची ओळख होती. नक्षलग्रस्त भागात अनेक मोठ्या मोहिमा यशस्वी करून त्यांनी पोलिस दलाचा गौरव वाढवला होता. जंगलातील कठीण परिस्थितीतही अत्यंत धैर्याने आणि चातुर्याने त्यांनी अनेक कारवाया पार पाडल्या. त्यांच्या नावाने नक्षलवादी घाबरत असल्याची चर्चा त्या काळात परिसरात मोठ्या प्रमाणावर होती. कर्तव्याला सर्वोच्च मानून काम करणारे चिन्ना वेंटा हे अत्यंत शिस्तप्रिय आणि निडर अधिकारी होते. त्यांनी अनेक जवानांना मार्गदर्शन केले होते. नक्षलविरोधी मोहिमांमध्ये त्यांच्या नेतृत्वामुळे पोलिस दलाला मोठे यश मिळाले होते. त्यामुळेच त्यांच्या कार्याची आठवण आजही पोलिस दलासह सर्वसामान्य नागरिक अभिमानाने काढतात.

श्रद्धांजली कार्यक्रमाच्या प्रारंभी शहीद श्री.चिन्ना वेंटा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी पोलिस निरीक्षक मच्छींद्रनाथ नागरगोजे साहेब, सहाय्यक पोलिस निरीक्षक मोतीरामजी मडावी साहेब, पोलिस उपनिरीक्षक गजानन साखरे साहेब, महिला पोलिस उपनिरीक्षक रोहिणी गिरवलकर मॅडम, पोलिस हवालदार प्रभाकर नाईक, पोलिस हवालदार भीवाजी हिचामी, पोलिस शिपाई प्रविन वैरागडे तसेच पोलिस शिपाई मोहन शिंदे उपस्थित होते.

उपस्थित अधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतात शहीद चिन्ना वेंटा यांच्या शौर्यपूर्ण कार्याचा गौरव केला. देशाच्या सुरक्षेसाठी जीवाची पर्वा न करता काम करणारे जवान समाजासाठी प्रेरणास्थान असल्याचे त्यांनी सांगितले. युवकांनी शहीद जवानांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून देशसेवेची भावना जपावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमात ग्रामस्थांनीही मोठ्या भावनेने सहभाग घेतला. “शहीद चिन्ना वेंटा अमर रहे” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तर मनात अभिमानाची भावना होती.

मौजा कृष्णार येथे पार पडलेला हा श्रद्धांजली कार्यक्रम राहतील, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.