रुग्णवाहिकेतून दारू तस्करीचा पर्दाफाश; आष्टी पोलिसांची धडक कारवाई

529

गडचिरोली

गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी पोलिसांनी अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आणला असून, पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर करून अवैध दारू तस्करी केली जात असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथून मोठ्या प्रमाणावर दारू तस्करीचे सिंडिकेट चालवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ‘गोकुल’ नावाचा व्यक्ती या संपूर्ण रॅकेटचा सूत्रधार असून, तो बराच काळ प्रशासनाला चकवा देत हा गोरखधंदा चालवत होता.
आष्टीचे पोलीस निरीक्षक विशाल काळे यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या पथकासह महात्मा फुले महाविद्यालय परिसरात सापळा रचला. काही वेळातच सायरन वाजवत भरधाव वेगाने येणारी रुग्णवाहिका दिसून आली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत वाहनाला घेरून थांबवले.
तपासणीदरम्यान पोलिसांना मोठा धक्का बसला, कारण रुग्णाऐवजी रुग्णवाहिकेत दारूची अवैध साठवणूक आढळून आली. देसी दारूसह ‘RS’ ब्रँडची विदेशी दारू निळ्या प्लास्टिकमध्ये लपवून ठेवण्यात आली होती.
या कारवाईत पोलिसांनी रुग्णवाहिका चालकासह दोन जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये चंद्रपूर येथील सुलतान मोहम्मद शेख आणि सौरभ चंदू गायकवाड यांचा समावेश आहे.
पोलिसांनी या प्रकरणात सुमारे ८ लाख २८ हजार रुपयांची दारू आणि संबंधित रुग्णवाहिका जप्त केली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेली दारू बनावट (डुप्लिकेट) असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्याची तपासणी होणे आवश्यक आहे. तसेच ही दारू गडचिरोलीतील ‘किशोर’ नावाच्या व्यक्तीकडे पोहोचवली जाणार होती, अशीही माहिती समोर आली आहे.
याशिवाय काही वाईन शॉपमधूनही या तस्करीला हातभार लावला जात असल्याचे व्हिडिओ समोर आले असून, चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दरम्यान, आष्टी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून मुख्य सूत्रधार ‘गोकुल’ याचा शोध सुरू आहे.