उप संपादक तेजेश गुज्जलवार
आलापल्ली–आष्टी राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली असून, अंत्यसंस्कारावरून परतणारी कार थेट नदीत कोसळली आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून, तिघे गंभीर जखमी आहेत.
नागेपल्ली येथील रहिवासी रविंद्र तंगडपल्लीवार यांच्या अंत्यसंस्कारानंतर नातेवाइकांना घेऊन परतणारी चारचाकी कार, खमनचेरू–बोरी दरम्यान दीना नदीवरील पुलावरून खाली कोसळली. मंगळवारी दुपारी ही दुर्घटना घडली.
रुग्णालय, रुग्णवाहिका, स्थानिक नागरिक
या अपघातात यादव विठ्ठलराव कोलपाकवार (वय ७३, आष्टी) आणि सुनील मुरलीधर कोलपाकवार (वय ५५, बोरी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अभिजीत यादव कोलपाकवार, अर्चना यादव कोलपाकवार आणि पद्मा सत्यानारायण कोलपाकवार हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
अहेरी उपजिल्हा रुग्णालय, चंद्रपूर
अपघातानंतर सर्व जखमींना तातडीने अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने तिघांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
अरुंद पूल, धोकादायक रस्ता
मिळालेल्या माहितीनुसार, दीना नदीवरील अरुंद पुलावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अभिजीत कोलपाकवार हे वाहन चालवत होते.
एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाल्याने कोलपाकवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेने पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.







