वडिलांच्या स्मृती जपत संतोषभाऊंचा सामाजिक उपक्रम : कमलापूर हत्ती कॅम्प येथे पर्यटकांसाठी पाणपोईचे लोकार्पण

76

कमलापूर : माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म हे ब्रीद जपत गडचिरोली जिल्हा भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संतोषभाऊ ताटीकोंडावार यांनी आपले वडील स्व.रामचंद्र ताटीकोंडावार यांच्या स्मृती प्रित्यर्थ एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवला आहे.कमलापूर येथील शासकीय हत्ती कॅम्पला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी त्यांनी ‘पाणपोई’ उभारली आहे.

कमलापूर शासकीय हत्ती कॅम्प हे गडचिरोली जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे.हत्तींचे संगोपन, प्रशिक्षण पाहण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतात.विशेषतः उन्हाळ्यात कडक उन्हातून आलेल्या पर्यटक,लहान मुले व वृद्धांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत होती.ही बाब लक्षात घेऊन संतोषभाऊ ताटीकोंडावार यांनी वडिलांच्या स्मरणार्थ कायमस्वरूपी पाणपोईची व्यवस्था केली.

यावेळी बोलताना संतोषभाऊ म्हणाले, माझे वडील स्व.रामचंद्र ताटीकोंडावार यांनी आयुष्यभर समाजसेवेचा वसा जपला.त्यांनी आम्हाला नेहमी शिकवण दिली की,गरजूंच्या मदतीला धावून जा.त्यांच्याच स्मृती जिवंत ठेवण्यासाठी व त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे.मरण पावलेल्या व्यक्तींचे स्मारक बांधण्यापेक्षा त्यांच्या नावाने जिवंत माणसांची सेवा करणे हीच खरी श्रद्धांजली आहे.

ही पाणपोई उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल व सहकार्य केल्याबद्दल संतोषभाऊंनी कमलापूर हत्ती कॅम्पच्या वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.याप्रसंगी वन विभागाचे अधिकारी,स्थानिक नागरिक,पर्यटक व ताटीकोंडावार कुटुंबीय उपस्थित होते.

संतोषभाऊ ताटीकोंडावार हे गडचिरोली जिल्ह्यात सामाजिक कार्य व भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणारे परिचित नाव आहे.यापूर्वीही त्यांनी रक्तदान शिबिर,गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत,आरोग्य शिबिरे असे अनेक उपक्रम राबवले आहेत.त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.