अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी
एटापल्ली : शिक्षण क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या संस्कार संस्था संचालित संस्कार पब्लिक स्कूल, एटापल्ली या इंग्रजी माध्यमाच्या शाळेने यंदाही यशाची परंपरा कायम राखत संपूर्ण तालुक्याचा गौरव वाढविला आहे. नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत शाळेतील कु. दिव्यानी योगेश गोंगले हिने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावून अभूतपूर्व यश संपादन केले असून तिच्या या यशामुळे एटापल्ली परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या संस्कार पब्लिक स्कूलने अल्पावधीतच गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे पालकांचा विश्वास संपादन केला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत शैक्षणिक प्रगतीसह स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन दिले जात असल्याने दरवर्षी या शाळेतील विद्यार्थी विविध परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवत आहेत.
यावर्षी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेतही संस्कार पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले आहे. कु. दिव्यानी योगेश गोंगले हिच्यासह कु. स्वराली मनेश मेश्राम या विद्यार्थिनी शिष्यवृत्तीस पात्र ठरल्या असून त्यांच्या या यशामुळे शाळेच्या गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामागे शिक्षकांचे परिश्रम, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची जिद्द महत्त्वाची ठरल्याचे बोलले जात आहे.
संस्कार पब्लिक स्कूल ही शाळा केवळ शैक्षणिक गुणवत्तेसाठीच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठीही ओळखली जाते. विज्ञान प्रदर्शनी, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा तसेच विविध सहशालेय उपक्रमांमध्येही शाळेचे विद्यार्थी सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि स्पर्धात्मक वृत्ती निर्माण करण्यासाठी शाळेकडून विशेष उपक्रम राबविले जातात.
या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका पूजा रमेश दासरवार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे संचालक विजय संस्कार यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे, शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे आणि पालकांच्या सहकार्याचे कौतुक करत भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी करण्याचा विश्वास व्यक्त केला.
यशस्वी विद्यार्थिनींनी आपल्या यशाचे श्रेय शिक्षक, आई-वडील तसेच शाळेने दिलेल्या योग्य मार्गदर्शनाला दिले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे एटापल्ली परिसरात सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून संस्कार पब्लिक स्कूलवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.







