तेजेश गुज्जलवार उपसंपादक
चामोर्शी : तालुक्यातील भेंडाळा परिसरातील १४ गावांतील सुपीक शेतजमिनी प्रस्तावित MIDC साठी अधिग्रहित करण्याच्या हालचालींविरोधात शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून या लढ्याला आता व्यापक जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त होत आहे. शेतकऱ्यांच्या जमीन, शेती आणि अस्तित्वाच्या संघर्षाला भारतीय कम्युनिष्ट पक्ष व ऑल इंडिया किसान सभा, गडचिरोली यांनी जाहीर समर्थन दिले आहे.
यासंदर्भात आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांना भारतीय कम्युनिष्ट पक्ष व ऑल इंडिया किसान सभा यांच्या वतीने अधिकृत समर्थन पत्र देण्यात आले. यावेळी भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्काच्या संघर्षात भाकपा व किसान सभा खंबीरपणे सोबत राहतील, असा विश्वास व्यक्त केला.
कॉ. मोतकुरवार यांनी जिल्हा प्रशासन व राज्य सरकारवर जोरदार टीका करताना म्हटले की, “गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः मुख्यमंत्री आहेत आणि अतिरिक्त सहपालकमंत्रीही आहेत, मात्र या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरा पालक कोण? हा प्रश्न आज शेतकरी विचारत आहे. उद्योगांच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण शेतकऱ्यांच्या वेदना ऐकण्यासाठी कोणीही पुढे येत नाही.”
ते पुढे म्हणाले की, भेंडाळा परिसरातील जमीन ही हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचा आधार आहे. ही जमीन केवळ माती नसून शेतकऱ्यांचे भविष्य, त्यांचे अस्तित्व आणि पुढील पिढ्यांचे जीवन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय कोणतेही जमीन अधिग्रहण सहन केले जाणार नाही.
येत्या २१ मे रोजी सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, चामोर्शी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य विराट मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. गावागावात जनजागृती करून हा मोर्चा ऐतिहासिक करण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.
शेतकरी विरोधी धोरणे रद्द करून प्रस्तावित MIDC तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा अधिक तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
“जमीन आमची — हक्क आमचा!”
“किसान एकता जिंदाबाद!”
“शेतकरी विरोधी MIDC हद्दपार करा!” ✊🚩







