अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी
एटापल्ली :- तालुक्यातील आदिवासी शेतकरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था घोटसुर तसेच आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था पिपली–बुर्गी येथे हंगाम 2025–2026 चा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. आदिवासी विकास महामंडळ, नाशिकचे संचालक मा. सईनुजी गोटा यांच्या शुभहस्ते दोन्ही सोसायट्यांचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमामुळे आदिवासी भागातील शेतकरी बांधवांना नव्या हंगामाबाबत आशा व आत्मविश्वास मिळाला आहे.
उद्घाटनप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मा. सैनुजी गोटा यांनी सांगितले की, आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था या केवळ खरेदी-विक्रीचे केंद्र नसून, आदिवासी शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचे प्रभावी माध्यम आहेत. शासनाच्या विविध योजना, धान खरेदी, कृषी निविष्ठा, आर्थिक व्यवहार तसेच शेतकऱ्यांच्या हक्काचे दर वेळेत मिळवून देण्यासाठी सहकारी संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. हंगाम 2025–26 मध्ये पारदर्शक, शिस्तबद्ध व शेतकरीहित केंद्रस्थानी ठेवून कामकाज करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाला तालुका काँग्रेस नेते प्रज्वल नागुलवार, सभापती बंडू इष्टाम, सभापती तथा सरपंच लालसु नरोटे, सचिव सुधाकर टेकाम, माजी सरपंच सुनील मडावी, माजी सरपंच बेबीताई हेडो, माजी सरपंच शिवाजी हेडो, माजी पंचायत समिती सदस्य लहुजी शेंडे, पोलिस पाटील नरोटे, पोलिस पाटील सुरेश मटामी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील कन्नलवार, सुशील कन्नलवार, शुभम पातेवार, पोलिस पाटील पिपली–बुर्गी लेकामी जी, सरपंच मुन्ना पुंगाटी, नामदेव हिचामी, सामाजिक कार्यकर्ते निकिता पुंगाठी, सुमित गोटा यांच्यासह शेकडो शेतकरी बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणातून आदिवासी भागातील शेती, रोजगार व सहकार चळवळीचे महत्त्व अधोरेखित केले. आदिवासी शेतकरी आजही पाणी, बाजारपेठ, भाववाढ व आर्थिक सुविधांसाठी संघर्ष करत असून, सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्यांना दिलासा मिळू शकतो, असे मत वक्त्यांनी व्यक्त केले. हंगाम सुरू झाल्यामुळे धान खरेदी, शेतमाल विक्री व इतर सेवा सुरळीतपणे राबवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त करत सहकारी संस्थांच्या माध्यमातून आपले प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. हंगाम 2025–26 च्या शुभारंभामुळे घोटसुर व पिपली–बुर्गी परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, आदिवासी शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी हा हंगाम यशस्वी ठरेल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.







