आलापल्ली येथील घटना दुर्दैवी हत्या; जंगलात आढळला दुचाकीस्वाराचा मृतदेह

1639

उप संपादक तेजेश गुज्जलवार

अहेरी तालुक्यात खळबळ उडवणारी घटना समोर आली असून रविवारी दुपारपासून बेपत्ता असलेल्या एका दुचाकीस्वाराचा रक्ताने माखलेला मृतदेह सोमवारी सकाळी जंगल परिसरात आढळून आला आहे. मृताच्या शरीरावरील गंभीर जखमा पाहता ही हत्या असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
नागोपल्ली (ता. अहेरी) येथील रविंद्र तंगडपल्लीवार (वय ४१) हे रविवारी कामानिमित्त दुचाकीवरून बाहेर पडले होते. संध्याकाळपर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीय व नातेवाइकांनी शोधाशोध सुरू केली. मात्र त्यांचा मोबाईल बंद असल्याने कोणताही संपर्क होऊ शकला नाही.
सोमवारी सकाळी आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गालगत, नागामदिराजवळील जंगलात, आलापल्लीपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर त्यांचा मृतदेह आढळून आला. मृताच्या डोक्यावर व शरीरावर धारदार शस्त्राने केलेल्या गंभीर जखमा दिसून आल्या असून एका हाताची बोटे तुटलेली असल्याचे आढळले आहे. घटनास्थळी दारूच्या बाटल्याही सापडल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच अहेरी उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे व पोलिस निरीक्षक हर्षल एकरे यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. प्राथमिक तपासात हत्या झाल्याचा संशय अधिक बळावला असून हत्येचे नेमके कारण व आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे.
रविंद्र तंगडपल्लीवार यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार असून या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे आलापल्ली–नागोपल्ली परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.