पेठा येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचा जल्लोषात प्रारंभ; राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या हस्ते उद्घाटन

222

अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी

एटापल्ली :- तालुक्यातील मौजा पेठा येथे आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन माजी राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. ग्रामीण भागातील युवकांना क्रीडाक्षेत्रात प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धांना परिसरातील क्रीडाप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उद्घाटन समारंभाला राजकीय, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभल्याने कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.
उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सौ. वनिता नरोटे सरपंच, मा. प्रशांत आत्राम जिल्हा महामंत्री भाजपा गडचिरोली तसेच उपसरपंच ग्रामपंचायत तोडसा, मा. प्रसाद पुल्लुरवार तालुका अध्यक्ष, मा. मोहन नामेवार जिल्हा सचिव भाजपा गडचिरोली, मा. योगेश कुमरे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा गडचिरोली, राकेश हिरा तालुका महामंत्री भाजपा एटापल्ली आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच सागर मंडल, राकेश बिरमवार, बाबला मजुमदार, मनिष ढाली, तिरू चापले, अनिकेत मामीडवार, सुधीर तलांडे, राजेश लोणकर, सम्मा जेठ्ठी, प्रदीप मोगरकर, दस्सा कोरामी (पोलीस पाटील), नितीन तोडेवार, बापु कोरामी, देवाजी गोटा, लालु पल्लो, भाऊजी भोगामी, चैतु पुंगाटी यांच्यासह पेठा येथील महिला व युवक मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना मा. राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी ग्रामीण भागातील युवकांमध्ये क्रीडा संस्कृती रुजविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. “खेळामुळे शारीरिक सुदृढतेसोबतच शिस्त, संघभावना व नेतृत्वगुण विकसित होतात. ग्रामीण भागातील तरुणांनी क्रीडाक्षेत्रात पुढे येऊन राज्य व देशपातळीवर नावलौकिक मिळवावा,” असे आवाहन त्यांनी केले. तसेच अशा स्पर्धांच्या माध्यमातून युवकांना सकारात्मक दिशा मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये तालुक्यातील विविध संघ सहभागी होणार असून, रोमांचक सामने पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. आयोजक समितीने स्पर्धेचे नियोजन शिस्तबद्ध व पारदर्शक पद्धतीने केल्याचे सांगितले. स्पर्धेदरम्यान खेळाडूंसाठी आवश्यक सुविधा, मैदानाची योग्य व्यवस्था तसेच प्रेक्षकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक केले. पेठा येथील ग्रामस्थ, महिला व युवक मंडळाने परिश्रमपूर्वक या स्पर्धेचे आयोजन केल्याने गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. या स्पर्धांमुळे स्थानिक युवकांना आपली क्रीडाप्रतिभा सादर करण्याची संधी मिळणार असून, भविष्यात अशाच उपक्रमांचे सातत्य राखण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला.