एटापल्ली
एटापल्ली शहराच्या मध्यभागी असलेले सांस्कृतिक गोटुल भवन आणि त्याचा उद्यान परिसर सध्या मोकाट गुरेढोरांचे आश्रयस्थान बनले आहे, हे दृश्य पाहून नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि खंत व्यक्त होत आहे. कालच मोकाट जनावरांमुळे शहरात MH33T5263 क्रमांकाच्या वाहनाचा अपघात होऊन एक नाहक जीव गमवावा लागला, ही अतिशय दु:खद घटना घडली. या घटनेनंतर पोलीस निरीक्षकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गुरे हाकलण्याची कारवाई केली, स्वतः पोलीस निरीक्षकांनी गुरे हाकल्याने नगर पंचायत च्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे
ही बाब केवळ वाहतूक सुरक्षेचा प्रश्न नव्हे, तर शहरातील सार्वजनिक ठिकाणांची दुर्दशा, प्रशासनाची अनास्था आणि मूलभूत नियोजनाचा अभाव या साऱ्यांचं एक कटू प्रतीक बनली आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च करून तयार करण्यात आलेल्या उद्यानात सध्या घाणीचं साम्राज्य पसरत आहे, आणि व्यायामासाठी बसवलेलं साहित्य मोकाट जनावरांच्या ताब्यात गेले आहे. या उद्यानात पूर्वी लहान मुले आनंदाने खेळायला येत असत, मात्र गुरेढोरांचा वावर आणि घाण पाहून भयभीत होऊन मुले परत निघून जात आहेत.
एखाद्या आदिवासी सांस्कृतिक गोटुल भवनाचा असा उपयोग होणे ही शोकांतिका आहे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. गोटुल हे आदिवासी संस्कृतीचे प्रतीक, आणि समाजाच्या एकतेचे केंद्र मानले जाते. अशा ठिकाणी जनावरांचे गोठा निर्माण होणे, म्हणजे आणि शहर नियोजनाचा अपयश अशी नागरिकांची भावना आहे.
एटापल्लीसारख्या शहरात अजूनही मोकाट जनावरांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था नाही, हे स्वतः प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं करतं. वाहनचालकांना दररोज धोका, मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत साऱ्यांचं आरोग्य धोक्यात, आणि शहराचा विकास गेला कुठे असे प्रश्न आज सामान्य माणसाच्या तोंडी आहेत.
*नगर पंचायतीची उदासीनता नागरिकांच्या सहनशक्तीच्या पलीकडे!*
एटापल्ली नगर पंचायतीने आजपर्यंत मोकाट जनावरांच्या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. शहरातील मुख्य रस्ते, चौक, उद्याने आणि सार्वजनिक जागा गुरेढोरांनी व्यापल्यात, तरीही नगर प्रशासनाकडून ना कुठली मोहीम राबवली गेली, ना पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यात आली. वर्षानुवर्षे हीच समस्या असूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिकांनी नगर पंचायतीवर निष्क्रियतेचा आरोप केला आहे. शहराच्या सौंदर्यीकरणासाठी लाखो रुपये खर्च केले जात असतानाही, मूलभूत समस्यांकडे डोळेझाक करणे हे प्रशासनाच्या प्राथमिकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करते, अशी जोरदार टीका होत आहे.