मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
प्रतिनिधी; तेजेश गुज्जलवार
एटापल्ली: संस्कार पब्लिक स्कूल, एटापल्लीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल नुकतीच विसापूर बॉटनिकल गार्डन, चंद्रपूर येथे यशस्वीपणे पार पडली. या सहलीत विद्यार्थ्यांनी विविध शास्त्रीय विषयांचा सखोल अभ्यास करून आनंदासोबतच ज्ञान मिळवले.
विद्यार्थ्यांनी वनस्पती शास्त्र, भौतिकशास्त्र, प्राणिशास्त्र, जीवसृष्टी, जीवशास्त्र, तसेच औषधी वनस्पतींचा सखोल अभ्यास केला. याशिवाय बटरफ्लाय गार्डन, रोज गार्डन, मत्स्यालय यांना भेट देऊन जैवविविधतेबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळवली. खेळातून विज्ञान शिकण्याचा अनोखा अनुभव विद्यार्थ्यांसाठी विशेष ठरला, ज्यामुळे विज्ञान अधिक रंजक बनले.
सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी तेथील वाचनालयात बसून विविध विषयांवरील पुस्तकांचे वाचन करून ज्ञानात भर घातली. तसेच निसर्गमाताच्या सान्निध्यात फोटोसेशन करत निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेतला.
या सहलीचे खास आकर्षण ठरले ग्लोबल वॉर्मिंग व त्यावर उपाययोजना या विषयावर गाईड श्री. उमरे यांनी दिलेले सखोल मार्गदर्शन. त्यांनी पर्यावरणातील बदल, त्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम, आणि या समस्येवर प्रभावी उपाययोजनांविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
शाळेचे प्राचार्या सौ. पूजा संस्कार म्हणाले, “विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे हे अशा सहलीचे मुख्य उद्दिष्ट आहे. या सहलीमुळे त्यांच्या ज्ञानात अमूल्य भर पडली आहे.”
विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवताना नवीन गोष्टी शिकण्याचा आनंद लुटला. सहलीचे यशस्वी आयोजन करण्यासाठी शाळेच्या शिक्षकवर्गाने विशेष परिश्रम घेतले. सहलीच्या आनंदासोबत अभ्यास हे या सहलीचे उद्धिष्ट सफल झाल्याचे शाळेचे संस्थापक श्री विजय संस्कार यांनी व्यक्त केले.