मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
प्रतिनिधी: तेजेश गुज्जलवार
आज सकाळी सोहंगाव ते मारोडा मार्गावर इंधन वाहक वाहनाचा भीषण अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले असून, मागील काही महिन्यांत काही गंभीर अपघात घडले आहेत.
याच दिवशी सायंकाळी, सोहंगावपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या कुरुमवाडा गावाजवळ आणखी एक भयंकर अपघात घडला. या दुर्घटनेत दिवाकर नानिया नरोटे (वय 24, रा. ताडगुडा) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर शंकर मनिराम नरोटे (वय 23, रा. ताडगुडा) गंभीर जखमी झाला आहे. कुरुमवाडा हे गाव छत्तीसगड सीमेलगत असल्यामुळे येथे प्रत्येक आठवड्याला मोठा कोंबड बाजार भरतो, ज्यामध्ये परिसरातील आणि छत्तीसगडमधील हजारो लोकांची गर्दी असते.
कोंबड बाजाराच्या ठिकाणी खुलेआम अवैध धंदे, सट्टा, दारूविक्री, आणि नशेच्या पदार्थांची विक्री चालू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या परिसरात नशा करण्याची सवय लागलेल्या अल्पवयीन मुलांची संख्या वाढत आहे, आणि या गैरकृत्यांमुळे गावकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. अवैध व्यवसायांमुळे तरुण पिढीवर होणारा वाईट परिणाम आणि अपघातांच्या घटनांनी गावातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
*पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह; नागरिकांची कडक कारवाईची मागणी*
अगोदरही या परिसरात एका पोलिस निरीक्षकाच्या वाहनाने गंभीर अपघात घडला होता, ज्यामध्ये एक व्यक्ती ठार तर दोन गंभीर जखमी झाले होते. स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनाकडे मागणी केली असली, तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. कोंबड बाजारात होणाऱ्या अवैध धंद्यांची तपासणी करणे, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे, किंवा या अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे या गोष्टींवर प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गावकऱ्यांनी उच्च अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. या अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर पावले उचलून, परिसरातील अपघातांच्या घटनांना आळा घालण्याच्या दृष्टीने पोलीस विभागाने त्वरित पावले उचलावीत, अशी नागरिकांची मागणी आहे. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची सुरक्षा व्यवस्था सुधारून, अवैध धंद्यांवर नियंत्रण आणले नाही तर भविष्यात या अपघातांची संख्या वाढू शकते, याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे