महिलांनी आरोग्य शिबिराचा लाभ घ्या: आ.धर्मराव बाबा आत्राम मुलचेरात ‘स्वस्थ नारी,सशक्त परिवार’ अभियान

250

मुलचेरा: महिलांचे आरोग्य आणि सक्षमीकरण हे कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या उद्देशाने सुरू झालेल्या ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या राष्ट्रीय अभियान अंतर्गत आयोजित आरोग्य शिबिराचा तालुक्यातील महिलांनी पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन माजी मंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.

मुलचेरा तालुका मुख्यालयातील ग्रामीण रुग्णालयात शुक्रवार (२६ सप्टेंबर) रोजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्मिता साळवे यांच्या नेतृत्वात भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर विश्वास,सरपंच भावना मिस्त्री,वैद्यकीय अधीक्षक डॉ.स्मिता साळवे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनोद म्हशाखेत्री तसेच आदी तज्ञ डॉक्टर उपस्थित होते.

पुढे बोलताना केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.या दरम्यान विविध विभाग विविध अभियान,शिबिरे घेऊन थेट नागरिकांच्या दारात येत आहे. आरोग्य विभाग देखील या अभियानात मागे नसून ‘स्वस्त नारी, सशक्त परिवार’ हा महत्त्वाचा अभियान हाती घेतला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील आयुष्यमान आरोग्य मंदिरे, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय तसेच विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले.या शिबिराच्या माध्यमातून आरोग्य तपासणी करून विविध आजारांवर उपचार केले जाणार आहे. त्यामुळे महिलांसोबतच पुरुषांनी देखील लाभ घ्यावा. तसेच आयुष्यमान भारत, आभा कार्ड, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना त्यासाठी नोंदणी देखील करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.यावेळी आयोजित आरोग्य शिबिराला महिला,पुरुष मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहून लाभ घेतला.