एटापल्ली :-
महाराष्ट्र शासनाने आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींना भाडेतत्वावर देण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्याच्या तयारीत असल्याचे महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दि. १९ सप्टेंबर रोजी गडचिरोली येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले. या निर्णयाविरोधात आदिवासी समाजात तीव्र संताप व्यक्त होत असून, या निर्णयाचा निषेध नोंदविण्यात आला आहे.
आदिवासी समाजाचे म्हणणे आहे की हा निर्णय अन्यायकारक, असंवैधानिक असून त्यांच्या मूलभूत अधिकारांवर आघात करणारा आहे. आदिवासींच्या जमिनी या केवळ आर्थिक साधन नाहीत तर त्यांचा सांस्कृतिक वारसा, सामाजिक अस्मिता व जीवनावश्यक साधनांचा प्रमुख आधार आहेत. जमिनीवर गैर आदिवासींना भाडेतत्वावर प्रवेश दिल्यास अन्नसुरक्षा, पारंपरिक जीवनशैली आणि स्थानिक अधिकार धोक्यात येणार असल्याचा इशारा समाजाने दिला आहे.
या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजाने शासनाचा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी केली असून, अन्यथा व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. हे आंदोलन शांततामय निदर्शने, सामाजिक जनजागृती आणि कायदेशीर मार्गांनी पुढे नेले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
आदिवासी समाजाने शासनाला तीन ठोस मागण्या केल्या आहेत –
1. आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींना भाडेतत्वावर देण्याचा निर्णय तातडीने मागे घ्यावा.
2. आदिवासी जमिनींचे संरक्षण आणि अधिकारांची हमी देणारे प्रभावी कायदे अमलात आणावेत.
3. आदिवासी समाजाशी संबंधित कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी समाजाचा सक्रिय सहभाग व सल्लामसलत अनिवार्य करावी.
आदिवासी समाजाच्या हितासाठी शासनाने सकारात्मक कारवाई करावी, अन्यथा न्यायासाठी संघर्ष करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी निवेदन देताना अक्षय पुंगाटी (अध्यक्ष) आदिवासी गोटुल समिती एटापल्ली, शुभम रापंजी (अध्यक्ष) आदिवासी युवा समिती एटापल्ली, किशोर कांदो पेसा अध्यक्ष कृष्णार, चमरू पाटील हिचामी पेसा सदस्य कृष्णार, ऋषिजी तेलामी पेसा सदस्य कृष्णार, सामजी हिचामी पेसा सदस्य कृष्णार, सौ. दीपयंती पेंदाम अध्यक्ष न. पं. एटापल्ली तथा सदस्य गोटुल समिती एटापल्ली, निजान पेंदाम नगरसेवक तथा सदस्य गो. स. एटापल्ली, किसन हिचामी नगरसेवक तथा सदस्य गो. स. एटापल्ली, नामदेव हिचामी पाणी पुरवठा सभापती तथा सदस्य गो. स. एटापल्ली, राहुल कुळमेथे नगरसेवक तथा सदस्य गो. स. एटापल्ली, उमेश पोरतेट सदस्य गोटूल, अजय सडमेक, उज्वल मडावी, शुभम दुर्वा, अंकुश कोरमी, निखिल कोरमी, भूपेश हेडो, गुरूदास सडमेक, सागर कुळयेटी, संतोष हिचामी, सचिन गोटा आदी सर्व आदिवासी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.