कोलपल्ली नाल्याच्या पुरात अडकलेले ग्रामसेवक उमेश धोडरे यांना जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेने वाचवले

807

प्रतिनिधी//

गडचिरोली, दि. २३ जुलै : मुलचेरा तालुक्यातील गोमणी येथील ग्रामसेवक श्री. उमेश धोडरे (वय ४५ वर्षे) हे आज सायंकाळी ६.०० वाजताच्या सुमारास कोलपल्ली नाल्याच्या अचानक वाढलेल्या पुराच्या पाण्यात अडकले. चारचाकी वाहनासह नाला ओलांडत असताना वाहनाला जोरदार पाण्याचा लोंढा लागला आणि वाहन वाहून गेले. मात्र, प्रसंगावधान राखत श्री. धोडरे यांनी एका झाडाला धरून ठेवले.

या घटनेची माहिती मिळताच, महसूल विभाग, पोलीस विभाग आणि स्थानिक बचाव पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अतिशय काळजीपूर्वक आणि समन्वयाने बचाव कार्य राबवून श्री. धोडरे यांना सुरक्षित रित्या बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य तपासणीसाठी रुग्णवाहिकेतून घरी रवाना करण्यात आले.

जिल्हा प्रशासनाच्या वेळीच घेतलेल्या कृतीमुळे मोठी दुर्घटना टळली. मुसळधार पावसामुळे नाल्यांना अचानक पूर येण्याच्या घटना वाढल्या असून अशा ठिकाणी प्रवास करताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे व पूलावरून पाणी वाहत असतांना पाण्यात गाडी न टाकण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.