“साने गुरुजी” किंवा “छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक बस सेवा योजना” राज्यभर लागू करा
छात्रभारती संघटनेमार्फत परिवहन मंत्री मा. प्रतापराव सरनाईक यांना निवेदन देण्यात आले
गडचिरोली, दि. १४ जुलै – गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम, डोंगराळ व आदिवासी भागांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज अनेक किलोमीटरचा खडतर प्रवास करावा लागत आहे. या विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी सुरक्षित व विनामूल्य बस सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी छात्रभारती संघटनेच्या वतीने राज्याचे परिवहन मंत्री मा. प्रतापराव सरनाईक यांच्याकडे करण्यात आली आहे.
या निवेदनात छात्रभारती संघटनेने म्हटले आहे, राज्य तसेच खास करून गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नियमित शालेय बस सेवा उपलब्ध करून देणे आणि राज्यस्तरीय योजनेंतर्गत “साने गुरुजी विद्यार्थी बस पास योजना” किंवा “छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक बस सेवा योजना” लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
विशेष बाब म्हणजे, ज्या प्रमाणे राज्य सरकारने शालेय मुलींसाठी “अहिल्याबाई होळकर मोफत बस पास योजना” सुरू केली आहे, त्याचप्रमाणे शालेय मुलांनाही समान सवलत मिळावी, अशीही स्पष्ट मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम जिल्ह्यांमध्ये शाळा अनेक किलोमीटर अंतरावर असून, बहुतांश विद्यार्थी पायी चालत शाळेत जातात. रस्ते खराब, जंगलातून जाणारे, पावसाळ्यात धोकादायक ठरणारे असल्याने शालेय उपस्थितीवर परिणाम होतो आहे. यामुळे शिक्षणात गळती वाढते आणि मुलांचे भवितव्य अंधारात जाते, अशी खंतही निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
या योजनांमुळे विद्यार्थी सुरक्षितपणे व नियमितपणे शाळेत उपस्थित राहू शकतील. शिक्षणाच्या दृष्टीने हा मोठा सकारात्मक पाऊल ठरेल, असा विश्वास छात्रभारतीने व्यक्त केला आहे. यावेळी विभाग नियंत्रकांना निवेदन देतांना छात्रभारती संघटनेचे माजी राज्य उपाध्यक्ष उमेश ऊईके, सुरज मडावी, राहुल भांडेकर, महेंद्र लटारे, पंकज खोबे, ताराचंद भांडेकर, हर्षल वैरागडे, रमेश कोठारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.