एटापल्ली नगरपंचायतीत दर महिन्याला “लोकशाही दिन” साजरा करण्याची मागणी – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा निवेदनाद्वारे आग्रह

153

प्रतिनिधी//

एटापल्ली (ता. एटापल्ली) –
एटापल्ली नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांच्या स्थानिक समस्या थेट ऐकून घेण्यासाठी आणि त्यावर तत्काळ कार्यवाही होण्यासाठी दर महिन्याला “लोकशाही दिन” आयोजित करण्यात यावा, अशी जोरदार मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) एटापल्ली शाखेने निवेदनाद्वारे केली आहे.

दिनांक ०९ जुलै २०२५ रोजी नगरपंचायत मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात भाकपाच्या जिल्हा सहसचिव व AIYF राज्य उपाध्यक्ष कॉ. **सचिन मोतकुरवार**, CPI जिल्हा कार्यकारिणी सदस्य **सुराज जक्कुलवार**, आणि शहर सचिव **कॉ. तेजस गुज्जलवार** यांनी स्वाक्षरी केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पाणीपुरवठा, सफाई व्यवस्था, नाली सफाई, आरोग्य सेवा, कचरा व्यवस्थापन, शासकीय योजना, वीजपुरवठा खंडित होणे, शौचालय अशा अनेक समस्या नागरिक भोगत आहेत. मात्र, या समस्यांवर त्वरित आणि प्रभावी उपाययोजना करण्यासाठी नागरिक व प्रशासन यांच्यात थेट संवादाची व्यवस्था नाही.

त्यासाठी दर महिन्याच्या एका निश्चित दिवशी **“लोकशाही दिन”** साजरा करून नगरपंचायतीची आमसभा घेण्यात यावी, जिथे नागरिकांना त्यांच्या अडचणी थेट मांडता येतील आणि प्रशासनाकडून तात्काळ कार्यवाही केली जाईल, अशी मागणी करण्यात आली आहे.

या दिवशी नागरिकांच्या उपस्थितीसाठी प्रचाराचे माध्यमे – पत्रके, सूचना फलक, मोबाईल मेसेजिंग यांचा उपयोग करून नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवावी, असेही सुचविण्यात आले आहे.

**“जर मागणी मान्य केली नाही, तर आम्ही जनआंदोलनाची दिशा स्वीकारू,”** असा इशाराही भाकपाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.