**एटापल्ली, २ जुलै** –
गडचिरोली जिल्ह्यातील गटटा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या **मौजा गुळुंजूर येथे नवीन आरोग्य उपकेंद्र** स्थापनेसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी **डॉ. प्रताप शिंदे** यांनी **मा. विरेन्द्र सिंह, सचिव (२), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई** यांच्याकडे अधिकृत प्रस्ताव पाठवला आहे. विशेष म्हणजे, ही कार्यवाही **भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर** करण्यात आली आहे.
**भाकपा जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार** यांनी गुळुंजूर परिसरातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी दीर्घकाळ सातत्याने पाठपुरावा केला. अनेक वेळा स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाकडे लेखी निवेदने, भेटीगाठी,आंदोलनात मागणी व बैठकीद्वारे ही गरज मांडण्यात आली होती.
भाकपाच्या या लोकहितवादी भूमिकेमुळे प्रशासनाने अखेर सकारात्मक पावले उचलली असून, **गुळुंजूर येथे उपकेंद्र स्थापन करण्यासाठी अधिकृत प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर** करण्यात आला आहे. डॉ. शिंदे यांनी यासंदर्भात लेखी पत्रातून ही माहिती दिली आहे.
कॉ. मोतकुरवार यांनी सांगितले, “आरोग्य हा मूलभूत हक्क आहे. गडचिरोलीसारख्या आदिवासी व दुर्गम भागात उपकेंद्रांची आवश्यकता मोठी आहे. गुळुंजूर व परिसरातील जनतेने हा लढा उचलून धरल्यामुळे आज ही पावले उचलली गेली आहेत.”
भाकपाच्या या प्रयत्नांचे स्थानिक नागरिकांकडून स्वागत होत आहे.
—