नगर पंचायत एटापल्लीने अखेर मांडल्या हात वर – चौफेर आरोपांनंतर निविदा प्रक्रिया रद्द _शिवसेनेसह अनेक सामाजिक संघटनांचा दबाव यशस्वी; मुख्याधिकाऱ्यांनी दिला तात्काळ निर्णय_

517

*एटापल्ली*
एटापल्ली नगर पंचायतमधील विकासकामांसाठी घेण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत झालेल्या कथित भ्रष्टाचार आणि अनियमिततेवर अखेर प्रशासनाला नमते घ्यावे लागले आहे. नगर पंचायत कार्यालयाच्या दिनांक 18/06/2025 रोजीच्या अधिकृत पत्रानुसार, मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहेत.

मुख्याधिकारी यांनी सादर केलेल्या शुद्धिपत्रकात “प्रशासकीय कारणास्तव खालील नमूद निविदा रद्द करण्यात येत आहेत” असे स्पष्टपणे नमूद केले आहे. यामध्ये चार निविदांची क्रमांकासह यादी देण्यात आली आहे

ही कारवाई म्हणजे शिवसेना व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी उठवलेल्या आवाजाचे व जनतेच्या रोषाचे परिणाम आहे. काही दिवसांपूर्वी प्रकाशित झालेल्या वृत्तात स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते की, नगर पंचायतच्या निविदा प्रक्रियेत ठराविक कंत्राटदारांना लाभ देण्यासाठी मनमानी अटी घालण्यात आल्या होत्या आणि प्रामाणिक कंत्राटदारांना त्रास देण्यात येत होता. एवढेच नाही तर, 20 ते 22 टक्क्यांपर्यंत ‘कट’ घेतल्याच्या आरोपांनी प्रशासनाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

शिवसेनेच्या तालुका पातळीवरील नेत्यांनी यासंदर्भात उपविभागीय अधिकारी एटापल्ली यांना दिलेल्या निवेदनातून तीव्र संताप व्यक्त केला होता. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनावर जनतेचा दबाव वाढत गेला आणि अखेर संबंधित निविदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

निविदा रद्द झाल्याने नगर पंचायत प्रशासनासमोर आता नव्याने आणि पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया राबविण्याचे मोठे आव्हान उभे आहे. यानंतर नव्या निविदा प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन, स्पष्ट आणि सर्व कंत्राटदारांना समान संधी देणाऱ्या असाव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे.