अहेरी तालुक्यातील अंगणवाडी भरती प्रक्रियेत घोटाळ्याचा आरोप; CBI चौकशीची मागणी…!

223

अहेरी : तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिस पदभरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत.माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल केली असून,या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा करत CBI चौकशीची मागणी केली आहे.

एकात्मिक बाल विकास प्रकल्प,अहेरी अंतर्गत भरतीसाठी जाहिरात देण्यात आली होती.पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात आले, मात्र आजवर गावनिहाय आणि गुणनिहाय यादी जाहीर करण्यात आलेली नाही.तक्रारीनुसार काही अधिकाऱ्यांनी उमेदवारांच्या नातेवाईकांना संपर्क साधून १ ते २ लाख रुपयांची मागणी केल्याचे प्रकार घडले आहेत.

या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद गडचिरोलीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी समिती गठीत केली असून, समितीने आज (७ मे) अहेरी येथील प्रकल्प कार्यालयात प्रत्यक्ष चौकशी सुरू केली आहे.सर्व भरतीसंबंधी दस्तावेज, नोंदी व संबंधित अधिकारी-कर्मचारी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या भरती प्रक्रियेतील संभाव्य गैरप्रकारांमुळे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून,या चौकशीचे निष्कर्ष कोणते खुलासे करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.