जारावंडी येथे 28 वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू; अपघात की घातपात? गावात चर्चेला उधाण

93

एटापल्ली: तालुक्यातील जारावंडी गावात एका युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. काल रात्रीच्या दरम्यान झालेल्या या घटनेमुळे गावात चर्चेला उधाण आले आहे. मृत व्यक्तीचे नाव मुकेश लक्ष्मण कोडापे (वय 28) असे असून तो आपल्या घरापासून सुमारे 100 मीटर अंतरावर नालीच्या काठावर पडलेला आढळला. विशेष म्हणजे त्याच्यावर सायकल पडलेली होती, जी घटनास्थळी आढळली.

काल रात्री गावात अचानक अवकाळी पाऊस झाला होता आणि त्याच दरम्यान विजेचा पुरवठाही खंडित झाला होता. अंधारात काही कळण्याच्या आतच ही घटना घडली असावी, असे काहींचे म्हणणे आहे. ही दुर्दैवी घटना आज सकाळी उघडकीस आली, तेव्हा गावकऱ्यांमध्ये भीती व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.

या घटनेबाबत गावात दोन मतप्रवाह दिसून येत आहेत. काही नागरिकांच्या मते, हा एक साधा अपघात आहे, कारण नालीच्या काठावर सायकलसह पडलेल्या अवस्थेत मुकेश आढळला. दुसरीकडे, काही गावकऱ्यांचा असा दावा आहे की हा अपघात नसून काहीतरी घातपात झाल्याचे स्पष्ट संकेत आहेत.

घटनेची गांभीर्याने नोंद घेऊन जारावंडी पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली आहेत. घटनास्थळाची बारकाईने तपासणी करण्यात आली असून, आजूबाजूच्या परिसरातील लोकांचीही चौकशी केली जात आहे. मृतदेहाला छाविच्छेदना साठी सामान्य रुग्णालय गडचिरोली ला पाठवले असून त्यानंतर या प्रकरणाचा पुढील तपास सुरू राहणार आहे. याबाबत अधिकृत अहवाल आल्यानंतरच या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल. दरम्यान, या घटनेबाबत गावात वेगवेगळ्या अफवा व चर्चा सुरू असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.पुढील माहिती मिळाल्यानंतरच या प्रकरणाचा संपूर्ण खुलासा होऊ शकेल.

_“प्राथमिक तपासात घातपाताचे कोणतेही ठोस पुरावे आढळलेले नाहीत. तथापि, मृतदेहाचे छाविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतरच या प्रकरणाचा खरा कारण समजेल. तपास पूर्ण होईपर्यंत कोणतीही शक्यता नाकारता येणार नाही.”_

*तेजस मोहिते,पोलीस निरीक्षक जारावंडी*