तिरुपती गंडमवारच्या घराजवळची स्थिती
एटापल्ली : नगरपंचायत येटापल्ली अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 9 मधील नाल्यांची अवस्था अत्यंत खराब आहे. पावसाळ्यानंतर या प्रभागातील नाली सफाईच्या कामास हात लावण्यात आला नाही. नालीचे पाणी आजूबाजूला पसरले आहे. परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना त्रास होत आहे. नगरपंचायत एटापल्लीचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
ऑक्टोबर दरम्यान पावसाळा संपला. यानंतर नगरपंचायतने नालीसफाईच्या कामास सुरुवात करायला पाहिजे होती. ऑक्टोबर ते मार्च असा सहा महिन्याच्या कालावधी संपला असला तरी नगरपंचायत नालीसफाई चे काम हाती घेत नाही. सांडपाणी, कपडे धुण्याचे पाणी, वाया गेलेले सगळेच पाणी तिरुपती गंडमवार ते संतोष गंडमवार यांच्या घराच्या आजूबाजूला गोळा होत आहे. प्लास्टिकनी नाली पूर्णपणे भरुन गेली आहे. घाणेरड्या स्वरुपाचा उग्र असा वास आजूबाजूला पसरत आहे. या प्रकारामुळे आजूबाजूच्या लोकांना डासांचा त्रास सुद्धा सहन करावा लागत आहे. डासाच्या निर्मूलनासाठी आरोग्य विभागाकडून फवारणी सुद्धा करण्यात येत नाही. अशीच स्थिती. राहिली तर आजूबाजूचे नागरिक मलेरिया सारख्या गंभीर आजाराला बळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नगरपंचायत एटापलीकडे सफाई कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांना किंवा या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना तिरुपती गंडमवारच्या घराजवळ बंद झालेली नाली व त्यात साचलेले पाणी दिसत नाही काय? असा प्रश्न आजूबाजूचे नागरिक करीत आहेत. यासाठी नगरपंचायत एटापल्लीला मुहूर्त शोधावा लागेल काय असाही उपरोधक प्रश्न परिसरातील नागरिक विचारत आहेत.