एटापल्ली तालुक्यात छत्तीसगडहून दारू आणि सुगंधित तंबाखूची तस्करी

88

प्रतिनिधी:- तेजेश गुज्जलवार

एटापल्ली तालुका छत्तीसगडच्या सीमेलगत असल्याने या भागातून मोठ्या प्रमाणावर दारू आणि सुगंधित तंबाखूची आयात केली जात आहे. सीमावर्ती भागांतून होणारी ही तस्करी प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे दिवसेंदिवस वाढत चालली आहे. स्थानिक बाजारपेठांमध्ये ही उत्पादने सहज उपलब्ध होत असून, यामुळे युवकांमध्ये व्यसनाधीनतेचा मोठा प्रसार होत आहे.

गुप्त मार्गांचा वापर करून छत्तीसगडमधून दारू आणि तंबाखू तालुक्यात आणली जात आहे. हे पदार्थ कमी किमतीत उपलब्ध असल्यामुळे स्थानिक विक्रेत्यांकडून त्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. या परिस्थितीने तालुक्याच्या सामाजिक, आर्थिक, आणि आरोग्यविषयक क्षेत्रावर गंभीर परिणाम होऊ लागले आहेत.

तक्रारी असूनही प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. कारवाईच्या अभावामुळे तस्करांचे मनोबल वाढले असून, ही समस्या अधिक गडद होत चालली आहे. योग्य ती पावले उचलली गेली नाहीत, तर हा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

*छुप्या मार्गाने आयात*

एटापल्ली तालुका छत्तीसगड सिमे लगत असल्याने वाहतूक सोपी आहे. छुप्या मार्गांचा वापर करून दारू आणि तंबाखू तालुक्यात पोहोचवली जाते. सीमावर्ती भागांमध्ये चोख बंदोबस्त नसल्याने तस्करांना हा मार्ग सुरक्षित वाटतो. गुप्त मार्गांचा वापर करून हे पदार्थ तालुक्यात पोहोचवले जातात.तर काही स्थानिक लोक कमी किमतीत या पदार्थांची विक्री करत असल्याचे उघड झाले आहे.

*तरुणाई व्यसनाच्या विळख्यात:*

तालुक्यातील युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढत असून शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवरही याचा नकारात्मक परिणाम होत आहे व्यसनाधीनतेमुळे कुटुंब व्यवस्थेत अडचणी निर्माण होत असून आरोग्यविषयक गंभीर समस्या वाढत आहेत.
शिवाय् व्यसनाधीनता आणि दारूच्या सहज उपलब्धतेमुळे गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत आहे.