गडचिरोली पोलीसांच्या सतर्कतेमुळे मिळाले तस्करी होणा­या गोवंश जनावरांना जीवनदान

215

दिनांक- 05/12/2024

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

# दोन वाहनांतुन केली जात होती एकुण 23 जनावरांची तस्करी
# वाचविलेल्यांपैकी एका गायीने आज पहाटे पोलीस स्टेशनच्या आवारातच दिला वासराला जन्म

गडचिरोली जिल्ह्रातील गोवंशीय जनावरांच्या कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतुक करणा­यांवर पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याच अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा श्री. शशीकांत दसूरकर यांना दिनांक 25/11/2024 रोजी पहाटे 04.00 वा. च्या सुमारास दोन पिकअप वाहनांमध्ये अवैधरित्या जनावरे भरुन आलापल्ली वरुन सिरोंचा मार्गे तेलगंणा राज्यात घेऊन जाणार आहेत, अशा मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व उप-पोस्टे जिमलगट्टा येथील पोलीस पथकाने उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा यांच्या नेतृत्वात जिमलगट्टा टि-पॉर्इंटच्या ठिकाणी सापळा रचून पाळत ठेवली होती, त्यावेळी दोन पिकअप वाहने संशयीतरित्या येतांना दिसून आले. सदर रोडवर तात्पुरता अडथळा निर्माण करुन दोन्ही वाहनांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही वाहने न थांबता वेगाने पोलीसांना चुकवून निघून गेली, पोलीस पथकाने पहाटेच्या अंधारात पाठलाग करुन सदर दोन्ही वाहनांना थांबविले असता चालक वाहन थांबवून अंधाराचा फायदा घेत जंगलाच्या दिशेने पळून गेले.
घटनास्थळावर दोन्ही वाहनांची तपासणी केली असता वाहन क्रमांक टी. एस. 20 टी. 9223 व दुसरे वाहन क्रमांक टी. एस. 02 यु. डी. 6881 या वाहनांमध्ये गोवंश जनावरे अतिशय निर्दयतेने एकमेकांवर कोंबून बांधलेले असल्याचे निदर्शनास आले होते. या दोन्ही वाहनांत एकुण 23 गोवंश जनावरे एक पाय आणि मान दोरीने निर्दयतेने बांधुन ठेवलेल्या अवस्थेत मिळून आली होती. पोलीसांनी समयसुचकता दाखवत दोन्ही वाहने स्वत: चालवून उप-पोस्टे जिमलगट्टा येथे आणली व दोरीने बांधलेली जनावरे सोडवून मुक्त केली. जनावरांची वाईट अवस्था बघून पोलीसांनी तात्काळ पशुवैद्यकीय अधिका­यांना पाचारण केले व सर्व जनावरांची वैद्यकीय तपासणी करवून घेतली, तपासणी दरम्यान दोन जनावरे मृत झालेले आढळली. तसेच इतर सर्व जनावरे अतिशय अशक्त असल्याचे वैद्यकीय अधिका­यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलीसांनी उप-पोस्टेच्या आवारातच सर्व जनावरांकरीता खुराक व वैद्यकीय उपचाराची व्यवस्था केलेली होती.
आज दि. 05/12/2024 रोजी पहाटेच्या सुमारास वाचविलेल्या जनावरांपैकी एका गायीने उप-पोस्टे जिमलगट्टाच्या आवारातच एका नवजात वासराला जन्म दिला आहे. सदर वासरासह इतर सर्व गोवंश जनावरांवर उपचार चालु असून ते ठिक व सशक्त होताच त्यांना चंद्रपुर येथील प्यार फाऊंडेशनच्या गोशाळेत पाठविण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सदर बाबत उप-पोस्टे जिमलगट्टा येथे अज्ञात आरोपीतांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपींचा शोध घेणे सुरु आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. श्रेणीक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा श्री. शशीकांत दसूरकर यांच्या नेतृत्वात उप-पोस्टे जिमलगट्टा प्रभारी अधिकारी, सपोनि. संगमेश्वर बिरादार व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पो.स्टे जिमलगट्टा येथील पोअं/येडणे, पोअं/वाघमारे, पोअं/बळदे, पोअं/गायकवाड, पोअं/सुंकरी, पोअं/वार्घट यांनी केलेली आहे.