कोरची येथे महिला शेतकरी दिवस आणि अन्न सुरक्षा दिवस साजरा आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडा आणि महिला किसान अधिकार मंच (मकाम) यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरीय महिला नेतृत्व मेळावा

80

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

कोरची:-आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडा आणि महिला किसान अधिकार मंच (मकाम) यांच्या संयुक्त विद्यमाने जननायक बिरसा मुंडा सभागृह कोरची येथे दिनांक 16 ऑक्टोंबर 2024 ला राष्ट्रीय महिला शेतकरी दिवस आणि अन्नसुरक्षा दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सतीश गोगुलवार सर संयोजक, आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडा हे होते तर प्रमुख पाहुणे श्रीमती शुभदा देशमुख संस्थापक सदस्य आम्ही आमच्या आरोग्यासाठी तसेच श्रीमती शालूताई कोल्हे निमगाव फिड संस्था तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती सरोज तितीरमारे ए.पी.ओ रोहयो विभाग तहसील कार्यालय कोरची तसेच इजामसायकाटेंगे सल्लागार सदस्य महाग्रामसभा कोरची हे मंचावर उपस्थित होते.
मंचावरील पाहुण्यांनी भारताचे संविधानाचे प्रास्ताविका क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले तसेच राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेचे पूजन आणि धान आणि मंड्या या पिकाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. या कार्यक्रमाची प्रस्ताविका शुभदा देशमुख यांनी मांडली. प्रास्ताविकेत महिलांचे जमिनीवरील, शेतीवरील हक्क त्याचबरोबर राष्ट्रीय महिला शेतकरी दिवस जो आपल्या भारत भरात २०१७ पासून १५ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो आणि अन्न सुरक्षा दिवस १६ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो. तसे १५ ऑक्टोबरला जागतिक पातळीवर आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. २०१३ पासून महिला किसान अधिकार मंच्याच्या पुढाकाराने भारतात महिला शेतकरी म्हणजेच भारतातील सर्व ग्रामीण महिला ह्या शेतकरी असतातच हि भूमिका मान्य करण्यात आली. शेती म्हणजे नुसते शेतात पीक घेणे असा सूक्ष्म अर्थ नसून मासेमारी करणारे महिला, पशुपालन करणारे महिला, गौणवनोपज गोळा करणारे महिला, शेतमजूर महिला ह्या सर्व महिला ह्या शेतकरी महिला आहेत आणि कुठेतरी यांच्या कामाची दखल घेणे गरजेचे आहे. सोबतच त्यांच्या या श्रमाचा सन्मान होणे देखील महत्वाचे आहे असे संबोधन प्रास्ताविकपर भाषणात कऱण्यात आले.
प्रास्ताविकेनंतर कोरची तालुक्यातील अशा महिला ज्यांनी स्वतः काहीतरी वेगळे कार्य केले किंवा वेगळे कार्य करत आहेत. आणि स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केलं अशा महिलांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये श्रीमती रसिका गावतुरे बेलगावघाट च्या रहिवासी असून त्यांनी उत्तम सेंद्रिय पद्धतीने सांदवाडी लागवड करून तो स्वतः बाइक चालवून गावोगावी विकतात आणि स्वतः ची उपजीविका मजबूत केलेली आहे आणि कुटुंबाची धुरा सांभाळीत आहेत. श्रीमती कमळजा मेश्राम सावली, श्रीमती विक्तुला नैताम मुक्काम झंकारगोंदी, यांनी २०२३-२४ मध्ये त्यांच्या बचत गटाच्या मदतीने हिरडा आणि मोहाचा सामूहिक व्यापार केला त्यातील नफा ही मिळवला आणि आता त्या ह्यावर्षी सुद्धा हिरडा आणि मोह फुलाचा व्यवसाय करण्यासाठी सज्ज आहेत. श्रीमती ग्यानबत्ती कोरेटी राहणार डाबरी, यांनी सुरुवातीला बकरीपालन हा जोड धंदा करण्यास इच्छुक नव्हत्या पण त्यांची परिस्थिति पाहता त्यांना बकरीपालन करण्यास प्रेरित केले गेले आणि सुरुवातीला संस्थेच्या मदतीने दोन बकरी देण्यात आले. त्यांना बकरी पालन करण्यात रस येऊ लागला आणि त्यांनी समोर दोन बकरीचे युनिट वाढवून सध्या त्यांच्याकडे १० बकरी आहेत. श्रीमती खिलेश्वरी मुलेटी मुलेटीपदीकसा, यांनी सर्व ग्रामसभेला एकत्र करून जांभळांचा व्यवसाय केला. सर्व ग्रामसभेला एकत्र करण्यापासून ते जांभळाची ची गाडी नागपूरला पाठवेपर्यंत पुढाकार घेऊन काम केले आणि समोरही त्यांचे असेच नियोजन असणार आहे. श्रीमती अमीता मडावी झेंडेपार ह्या पेसा मोबी लाईजर असून गावामध्ये वन हक्क कायदा आणि पेसा कायद्याची सर्व ग्रामसभेला नेहमीच माहिती सांगणे महिलांना एकत्र घेऊन चर्चा करणे आणि याविषयी माहिती देण्याचे मोलाचे काम करतात. श्रीमती रंजना गोटा साल्हे ह्या साल्हे ग्राम सभेतील बाल संरक्षण समिति मधील सदस्य असून गावातील मुलांच्या सुरक्षिततेसाठी सतत प्रयत्नशील आहेत. श्रीमती जमुनाबाई बोगा पडियालजोब यांनी त्यांच्या बचत गटाच्या मदतीने गांडूळ खत निर्मिती व्यवसाय सुरू केलेला आहे. श्रीमती अस्मिता गावडे राहणार डाबरी यांनी संस्थे अंतर्गत काम करीत असतांना उत्तम सेंद्रिय शेती तसेच त्यांच्या कार्यक्षेत्रातील सावली, डाबरी आणि पडियालजोब या गावतील महिला सभा मजबुतीकरणाचे काम त्या उत्तमरित्या करीत आहेत. या सर्व महिला समाजात इतर व्यक्तीसाठी उदाहरण म्हणून काम करत आहे याचे नेतृत्वाच्या वृत्तीमुळे त्यांना ‘नेत्री’ म्हणून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात त्यांनी देखील मंचवरून त्यांचे अनुभव मांडले. या नेत्री आपल्या अनुभवाची मांडणी करत असतानी त्यांनी केलेल्या कामाचे फोटो प्रोजेक्टर द्वारे सर्व उपस्थिताना दाखविण्यात आले. त्यानंतर श्रीमती शालू कोल्हे, फिड संस्था कार्यकर्ता, यांनी मासेमारी विषयी स्वतः महिलांना घेऊन केलेल्या आपल्या कामाचे अनुभव आणि तलावांचे पुनरुज्जीवन करण्याच्या पद्धती आणि सोबतच मुलकी माशांच्या प्रजातीचे संरक्षण आणि संवर्धन या विषयावर उपस्थिताना मार्गदर्शन केले. त्यानंतर श्री. इजामसाय काटेंगे यांनी सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती गोणवन उपज, बांबू, हिरडा, तेंदुपत्ता, तसेच ग्रामसभेच्या माध्यमातून आपण वन आधारित काय काम करू शकतो याविषयी मार्गदर्शन केले. महिला सकाळपासून तर सायंकाळपर्यंतचे हे सगळे करतात पण त्यांच्या श्रमाला ओळख आणि सन्मान मिळत नाही आणि याविषयी ची समाजामध्ये जाणीव निर्माण करणे खूप गरजेचे आहे हे या कार्यक्रमाच्या दिवशी मान्य करावे लागेल आणि त्यानुसार पुढील कामाला लागावे लागेल असे मत इजामसाय काटेंगे यांनी व्यक्त केले. रोजगार हमी योजना संदर्भात लोकांना माहिती देताना श्रीमती सरोज तितिरमारे यांनी माहिती दिली की, अंदाजपत्रक बनवण्यासाठी अपेक्षित असलेल्या कागदपत्रांची यादी सांगितली. कागदपत्र जमा करताना त्यामध्ये कोणते चुका करू नये त्यासाठी कोणत्या चुका करणे टाळावेत. सार्वजनिक पट्ट्यामध्ये वन विभागाचे काम घेत असताना त्याचे अंदाजपत्रक बनवताना काय काम करता येतील तसेच ग्रामपंचायत मधील जीपीटीपी मध्ये आपले काम कशाप्रकारे मांडता येतील याविषयी सविस्तर माहिती श्रीमती सरोज तितिरमारे यांनी दिली. डॉ. सतीश गोगलवार सर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षीय मार्गदर्शन करताना वनकार्य योजना आराखडा त्यामध्ये तलाव, सिमेंट बंधारे, मजगी, यांचा नियोजन करून आराखडा तयार करून यंत्रणा म्हणून मान्यता मिळालेल्या ग्रामसभांनी शासनाकडे सादर करणे हे काम चांगल्या प्रकारे पार पाडणे तेव्हाच आपल्या गावात आपले सरकार निर्माण होईल आणि एक स्वयंशासन निर्माण होईल अशी माहिती डॉ. सतीश गोगुलवार सर यांनी दिली. २०२४ च्या भूक निर्देशांकामध्ये १२७ देशांत भारत १०५ स्थानावर आहे. ज्यामधे भारतातील १३.७% मुले कुपोषित, ३५.५% पाचवर्षीय कमी उंचीचे मुले, १८.७% पाच वर्षाखालील कमी वजनाची मुले आहेत तर २.०९% पाच वर्षाखालील मुलांचा मृत्युदर आहे. यातून हे दिसते कि अन्न सुरक्षेसोबातच पोषक अन्न पुरवठा देखील महत्वाचा आहे. त्यामुळे जंगलातील रानभाज्या, मोहफुलाचे खाद्य पदार्थ, घरच्या सांदवाडीतील वैविध्यपूर्ण फळभाज्या, फुलभाज्या,पालेभाज्या घरच्या किंवा स्थानिक पशुपालानातून मिळणारे अंडी मांस मच्छी यांचा जेवणात समावेश करने तसेच शेतीतून सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतल्या जाणाऱ्या पिकांचा आपण सेवन केले तर आपले आरोग्य निरोगी आणि सुदृढ राहील याबाबत मार्गदर्शनामध्ये डॉ. गोगूलवार सरांनी माहिती दिली.
कार्यक्रमांमध्ये विविध महिला शेतकरी यांनी सेंद्रिय पद्धतीचे पारंपारिक भाजीपाला, फळ यांचे स्टॉल लावलेले होते कार्यक्रमांमध्ये 31 गावातील 200 महिला शेतकरी उपस्थित होत्याकार्यक्रमाचे संचालन विनोद भोयर यांनी केले तर आभार अनुसया काटेंगे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती कुमारीबाई जमकातन (प्रकल्प समन्वयक, आ.आ.आ.), श्रीमती पद्मा उईके (प्रकल्प व्यवस्थापक, आ.आ.आ.), हर्षल धाबेकर (पाणलोटक्षेत्र तज्ञ, आ.आ.आ.), गुलशाद राही (मार्केटिंग तज्ञ, आ.आ.आ), चेतन चौधरी, डॉ.सौरभ (प्रकल्प समन्वयक, आ.आ.आ.), आणि कोरची तालुक्यातील आ.आ.आ संस्थेतील समस्त स्थानिक कार्यकर्ते यांनी सहकार्य केले.