मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
गडचिरोल्ली :दिनांक 01/10/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथील सहा. पोलीस निरीक्षक राहुल आव्हाड हे कर्तव्यावर असतांना, त्यांना त्यांचे गोपनिय बातमीदारांमार्फत खात्रिशिर माहिती मिळाली की, अजय चिचघरे हा दारु विक्रेता त्याचे साथीदार गौरव कोडाप व त्याच्या साथीदारांच्या माध्यमातून महिंद्रा पिक अप वाहन क्रमांक एम.एच.- 36-टी-2449 या वाहनाने चंद्रपूर जिल्ह्रातून दारुची मोठी खेप घेवून येत आहे. त्यावरून पोलीस पथकाने सापळा रचून चंद्रपूर-गडचिरोली मार्गावर नाकाबंदी करून दारुचे वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता, वाहन चालक गौरव कोडाप याने पोलीसांच्या कायदेशिर आदेशास न मानता वाहन भरधाव वेगाने वाकडी-सेमाना मार्गे पळविले. तेव्हा सपोनि. राहुल आव्हाड यांनी त्यांच्या सोबतच्या पोलीस पथकासह शासकीय वाहन क्रमांक एम.एच. 33 ए.सी. 6489 याने पाठलाग सुरु केला असता, पोलीसांनी वारंवार वाहन चालकास त्याचे वाहन थांबविण्याबाबत आवाज दिला असता, वाहन चालक व त्याच्या साथीदाराने त्यांचे वाहन न थांबविता भरधाव वाहनातून पोलीसांना शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अंदाजे 30 ते 35 किलोमिटर पाठलाग करीत असतांना वाहन चालकाने त्याचे ताब्यातील दारुने भरलेले वाहन थांबविले. पोलीस पथकाने वाहन चालकास व वाहनास ताब्यात घेण्याच्या उद्देशाने त्यांचे वाहनातून उतरुन दारुच्या वाहनाकडे जात असतांना वाहन चालकाने परत शिवीगाळ करून “आज तुम्हे कुचल डालेंगे” असे म्हणून पोलीसांचा जिव घेण्याच्या उद्देशाने दारुने भरलेले वाहन रिव्हर्समध्ये भरधाव वेगाने पोलीस पथकाचे अंगावर आणले. पोलीसांनी आपला बचाव करून रोडच्या कडेस उडी घेतल्याने त्यांना दुखापत झाली नाही परंतु, शासकिय वाहनाचे मोठ¬ा प्रमाणात नुकसान होवून ते क्षतीग्रस्त झाले. याचाच फायदा घेवून आरोपीं हे घटनास्थळावरुन दारुने भरलेले त्यांच्या ताब्यातील पिकअप वाहन घेवून जंगलमार्गे पसार झाले.
त्यासंदर्भात पोलीस स्टेशन, गडचिरोली येथे आरोपीतांविरुद्ध खुनाचा प्रयत्न व शासकिय कामात अडथळा या सदराखाली गुन्हा नोंद करून तपासात घेतला. गुन्ह्राचे तपासी अधिकारी भगतसिंग दुलत यांनी त्यांचे गोपनिय बातमीदार सक्रिय करून आरोपींबाबत माहिती घेतली असता, सदर आरोपी नागपूर येथे पळून गेले असल्याची खात्रिशीर माहिती मिळाली. सदर माहिती वरिष्ठांना कळवून त्यांच्या परवानगीने स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथील तपास पथक नागपूर येथे रवाना होवून पोलीस स्टेशन सिताबर्डी, नागपूर शहर हद्दीत लपून बसलेले आरोपी नामे गौरव धामदेव कोडाप, रा. बोदली, ता. जि. गडचिरोली व प्रणय सुधिर पंदिलवार, रा. काटली, ता. जि. गडचिरोली यांना ताब्यात घेवून आज दिनांक 11/10/2024 रोजी अटक करण्यात आली. सदर आरोपींना मा. न्यायालयापुढे हजर केले असता, मा. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. उल्हास भुसारी, सपोनि. भगतसिंग दुलत, पोहवा/सतिष कत्तीवार, प्रेमानंद नंदेश्वर, अकबर पोयाम, राकेश सोनटक्के, पोअं/श्रीकांत बोईना, श्रीकृष्ण परचाके, शुक्राचारी गवई व उमेश जगदाळे यांनी पार पाडली.